दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या टोळीकडे दहशत पसरविण्यासाठी वापरण्यात येणारे घातक असे ४० स्फोटक गोळे (आपट बार) सापडले आहेत. हे गोळे तयार करण्याची कला या दरोडेखोरांना अवगत असून, हे गोळे नेमके कुठे तयार केले व त्याचा कुठे वापर झाला का, याचा तपास मुंढवा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
चिंडू सिलोन राजपूत (वय २५), संग्राम गिल्ली राजपूत (वय ३०, रा. मध्यप्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली असून, देवा महाशेर राजपूत, बधिस अंगुरशे राजपूत व छोटू (पूर्ण नाव पत्ता नाही) हे तिघे फरार झाले आहेत. मुंढवा पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये २८ एप्रिलला दोघांना अटक करण्यात आली. हडपसर रेल्वे स्थानकाच्या मागे असलेल्या शेतामध्ये ही टोळी पहाटे दरोडय़ाच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे दोन कुऱ्हाडी, करवत, कोयता, चार सुरे, मिरची पूड आदी गोष्टी सापडल्या. महत्त्वाचे म्हणजे या टोळीकडे स्फोटक गोळेही आढळून आले.
स्फोटक धातूचे हे गोळे दरोडेखोरांनी स्वत: तयार केले असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. दरोडा टाकणार असल्याच्या भागामध्ये दूरवरून हे गोळे फेकून स्फोट घडवून आणायचा व नागरिकांची पळापळ झाल्यानंतर त्याच कालावधीत दरोडा टाकायचा, अशी दरोडेखोरांची योजना होती. अशाच प्रकारे आरोपींनी कुठे दरोडा टाकला आहे का, किंवा संबंधित घातक गोळे कुठे तयार केले जातात, याचा तपास सध्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. तपासासाठी न्यायालयाने अटक आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.