थेरगाव येथे एक ध्येयवेडी तरुणी हस्तकला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ती ‘देस रंगीला’ या संकल्पनेतून देशाच्या कानाकोपऱ्यातील कुशल कलाकारांशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने या वस्तू बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. याद्वारे तीने या कलाकारांना रोजगारही मिळवून दिला आहे.

अदिती खोत असे या ध्येयवेड्या तरुणीचे नाव आहे. भारताच्या प्राचीन कला जोपासत देशातील अनेक कलाकार ‘इको फ्रेंडली’ वस्तू तयार करतात. मात्र या वस्तू केवळ उत्सवांच्या काळातच विकल्या जातात. त्यामुळे कलाकारांना वर्षभर रोजगार उपलब्ध होत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून अदिती त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही करत आहे. तिने ‘देस रंगीला’ या संकल्पनेतून महाराष्ट्र, ओदिशा, आंध्रप्रदेश, मणिपूर, आसाम, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, केरळ, पश्चिम बंगाल या ठिकाणच्या कलाकारांशी संपर्क ठेवला आहे. अदितीने शास्त्रशुद्ध पद्धतीने एक वर्ष हस्तकलेचा अभ्यास केला. त्यामुळे तिला हस्तकलेमध्ये अधिक आवड निर्माण झाली.

अदिती ही देशातील विविध भागांतून हस्तकला कारागिरांकडून वस्तू विकत घेते आणि त्या वस्तू पिंपरी-चिंचवडमध्ये ना नफा, ना तोटा या तत्त्वावर विकते. यामुळे या कलाकारांना आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळतो आणि ग्राहकाला समाधान. वर्षातील बाराही महिने अदिती या कामात व्यस्त असते. काही काळ पुण्यातील प्रसिद्ध तुळशीबाग या बाजारपेठेत या वस्तू विक्रीचा अनुभव घेतल्यानंतर सध्या ती घरातूनच या वस्तूंची विक्री करते. तिच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसादही मिळत आहे. ग्राहक हस्तकलांच्या वस्तू शोधत आपल्यापर्यंत येत असल्याचा तिचा अनुभव आहे.

अदितीकडे दुधी भोपळ्यापासून तसेच नारळाच्या करंवटीपासून बनवलेले आकर्षक दिवे, कलमकारी आसन, ब्लॅक पॉटरी, प. बंगालची गवताची चटई, वॉल हँगिंग, छत्तीसगड येथील बांबूचा दिवा, लॉकी लॅम्प, राजस्थानातील कोस्टर, अगरबत्ती स्टँड, बिहारमधील बुकमार्क, ल्युडो, सापशिडी, कागदाच्या लगद्यापासून बनवलेले विविध मुखवटे या वस्तू उपलब्ध आहेत.
[jwplayer jlYhKeEm]