अक्षरधारा बुक गॅलरीच्या वतीने ‘खेळा नाचा वाचा वाचू आनंदे बालकुमार शब्दोत्सव’मध्ये ‘किमया सुंदर हस्ताक्षराची’ या कार्यक्रमात बालकुमार आणि पालकांसाठी ‘किमया सुंदर हस्ताक्षराची’ ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
‘‘डोळे म्हणजे अक्ष आणि र म्हणजे रम्य, सुंदर तसेच याचा दुसरा अर्थ – अ म्हणजे न संपणारे आणि क्षर म्हणजे नाश होणे याचे आपण एकत्रीकरण केल्यास कधीच नाश होऊ नये अशी गोष्ट म्हणजे अक्षर असा सुंदर अर्थ आपल्यासमोर उलगडतो. जर इतका सुंदर अन्वयार्थ असणारा शब्द म्हणजेच ‘अक्षर’ असेल, तर ते आपण कुणालाही न दाखवण्याइतके वाईट का काढायचे,’’ असा प्रश्न कार्यशाळेचे मार्गदर्शक शैलेश जोशी यांनी करताच उपस्थितांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
उपस्थितांच्या शंकांचे निरसन करताना जोशी यांनी कार्यशाळेत इंग्रजी, मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या अक्षर लेखनातील अनेक शंका दूर झाल्या. अक्षरधाराच्या कुसुमाग्रज वाचक कट्टय़ावर झालेल्या या कार्यशाळेत सहभागी पालकांनी कार्यक्रमानंतर झालेल्या चच्रेच्या वेळी भाषेच्या लिखित माध्यमाचा म्हणजेच अक्षरांबाबत आणि त्यांच्या लिखाणाच्या योग्य पद्धतीबाबत शैक्षणिक वर्षांच्या प्राथमिक स्तरावर मार्गदर्शन मिळाल्यास आमचे देखील हस्ताक्षर आज सुंदर दिसले असते, अशी कबुली दिली.
या वेळी देवनागरी लिपीच्या जन्माची अनोखी कहाणीही जोशी यांनी सांगितली. ते म्हणाले की, जेव्हा मराठी, हिंदी या भाषांच्या लिखाणासाठी स्वीकारली गेलेली देवनागरी लिपी आकाराला येत होती तेव्हा ॐ आणि श्री या अक्षरांचे आकार आणि स्वरूप यांचे अनेक खंडित अर्थ लावले गेले आणि बाराखडीमधील इतर अक्षरांना स्वतंत्र आकार प्राप्त झाले. सुरुवातीला मराठी किंवा हिंदी लिहायला शिकूया असे म्हणण्यापेक्षा देवनागरी लिपीच्या चिन्हित स्वरूपाची माहिती रंजक पद्धतीने, मुलांना समजेल अशी समजवली पाहिजे, तरच भाषा योग्यरीत्या वाचताही येऊ शकेल. त्याचा एकूण परिणाम थेटपणे शालेय परीक्षांमधील गुणांवर दिसून येतो. अक्षर सुंदर असेल तर चांगले गुण सहजच मिळवता येतात. कारण मांडलेले मुद्दे अचूक असतील पण लिहिलेली अक्षरे शिक्षकांना समजलीच नाहीत तर गुणांकन करताना नुकसान होऊ शकते. असे होऊ नये यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने शाई पेनाचा वापर करून रोज सुंदर हस्ताक्षर काढण्याचा सराव केला पाहिजे.
जोशी यांनी ‘किमया सुंदर हस्ताक्षराची’ या कार्यशाळेत विविध अभ्यासक्रमांमध्ये अक्षरांची निर्मिती आणि त्यांचे सुयोग्य वळण यानुसार अक्षर काढण्याबाबत स्वतंत्र वर्ग घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या विधानाच्या पूरक स्पष्टीकरणात ते म्हणाले की, शालेय वयात हातांना वळण लागले तर वाढत्या वयात उत्तम सराव होऊ शकतो. कोणतीही कला अवगत करताना सराव आणि त्यासाठी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्या कलेमध्ये आपण उत्तरोत्तर पारंगत होत जातो. त्यामुळे संपूर्ण आयुष्यभर आपल्याला साथ देणारे हस्ताक्षर सुंदर, नीटनेटके आणि आखीव असेल तर विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकासात मोलाची भर पडते. तसेच कर्मचारी किंवा व्यावसायिकांच्या जीवनातही आत्मविश्वास आणि सुसंघटित नियोजनबद्धतेसाठी सुंदर हस्ताक्षर अतिशय महत्त्वाचे आहे. अक्षरधाराचे व्यवस्थापक सुधीर डोंबाळे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे मार्गदर्शक जोशी यांना संस्थेच्या वतीने पुस्तक भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता देसाई यांनी केले.