संगणक अभियंता ज्योतीकुमारी चौधरी हिच्यावर बलात्कार करून खून करणाऱ्या दोघांची फाशी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
हिंजवडी येथील विप्रो कंपनीत ज्योतीकुमारी चौधरी काम करीत होती. १ नोव्हेंबर २००७ रोजी कॅब चालक पुरुषोत्तम बोराटे व त्याचा मित्र प्रदीप कोकाटे यानी गहुंजे येथील निर्जनस्थळी नेऊन ज्योतीकुमारीवर बलात्कार केला. त्यानंतर तिचा निर्घृणपणे खून केला होता. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलिसांच्या एका पथकाने या दोघांना अटक केली होती. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्य़ात सत्र न्यायालयाने दोघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयानेही या दोघांची फाशी कायम ठेवली होती. आता सर्वोच्च न्यायालयानेही दोघांना फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.