बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली विशेष न्यायालयाने शुक्रवारी पुण्यात पहिली शिक्षा सुनावली. दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी राजेंद्र भीमा असुदेव (वय ३१, रा. गुलटेकडी) याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली दहा वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या कायद्याखाली झालेली राज्यातील ही दुसरी शिक्षा आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. विशेष न्यायाधीश एस. डी. दरणे यांच्यासमोर हा खटला चालला. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रताप जाधव यांनी पाच साक्षीदार तपासले. गुलटेकडी परिसरात राहत असलेल्या पीडित मुलीबरोबर असुदेव याने २२ मार्च २०१३ रोजी व अगोदर दोन दिवस अनैसर्गिक कृत्य केले. घटनेच्या दिवशीही त्याने तसेच केले. हा प्रकार एका महिलेने पाहिला आणि पीडित मुलीच्या आईला सांगितले. त्यानंतर याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात पीडित मुलगी आणि वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. या विशेष कायद्याखाली न्यायालयाने सुनावलेली ही पहिली शिक्षा आहे.
मेहुणीवर बलात्कार करणाऱ्यास सक्तमुजरी
पत्नीच्या प्रसूतीसाठी घरी आलेल्या मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पर्वतीदर्शन येथील ३५ वर्षांच्या व्यक्तीला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर एक हजार रुपये दंडही ठोठावला. २५ जून २०१० रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी १७ वर्षांच्या पीडित मुलीने तक्रार दिली होती. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी सात साक्षीदार तपासले. यामध्ये डॉक्टर, पीडित मुलगी आणि आरोपीची पत्नी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.