ऑस्ट्रेलियातील ‘ल ट्रोब युनिव्हर्सिटी’ आणि ‘मिटसॉम कॉलेज’ (एमआयटी स्कूल ऑफ मॅनेजमेंट कॉलेज) यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला असून याअंतर्गत विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रमासह विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीअंतर्गत ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षण घेण्याची संधीही मिळू शकणार आहे.
मिटसॉम कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. एम. चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘एमआयटी स्कूल ऑफ बिझनेस’चे कार्यकारी संचालक राहुल कराड, ‘ल ट्रोब’ विद्यापीठाचे उपाध्यक्ष जॉन रोझेनबर्ग, विद्यापीठाच्या विज्ञान, तंत्रज्ञान व अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता ब्रायन मॅकगॉ, विद्यापीठाच्या भारतातील व्यवहारांचे प्रमुख अमित मल्होत्रा या वेळी उपस्थित होते.
या सामंजस्य कराराअंतर्गत विद्यार्थ्यांना गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती मिळू शकणार असून पाच हजार ते वीस हजार डॉलर्सपर्यंतच्या शिष्यवृत्ती ‘ल ट्रोब’ विद्यापीठाकडून देण्यात येतात. तसेच ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’मध्ये येथील प्राध्यापकांना पीएच.डी. आणि एम. फिल.साठीचे संशोधन विद्यापीठातून करण्याची संधी या कराराअंतर्गत उपलब्ध होऊ शकेल.
रोझेनबर्ग यांनी सांगितले, ‘‘ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढते आहे. ऑस्ट्रेलियात शिकायला येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यसाठीच्या नवीन धोरणानुसार विद्यार्थ्यांने दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याला दोन वर्षे ऑस्ट्रेलियात राहणे व नोकरी करणे यासाठीचा व्हिसा मिळू शकतो. सध्या ल ट्रॉबे विद्यापीठात ७९० भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतात. विज्ञान- तंत्रज्ञानात शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांत भारतीय विद्यार्थी सर्वाधिक आहेत, तर चिनी विद्यार्थी द्वितीय क्रमांकावर आहेत. व्यापार व व्यवस्थापन क्षेत्रात मात्र चिनी विद्यार्थी सर्वाधिक व भारतीय विद्यार्थी द्वितीय क्रमांकावर आहेत.’’
अमिताभ बच्चन यांच्या नावे शिष्यवृत्ती
‘ल ट्रोब’ विद्यापीठातर्फे अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या नावे भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक विशेष शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. भारतातील चित्रपटसृष्टी आणि प्रसारमाध्यमांविषयी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती असेल. २२ मे रोजी अमिताभ  विद्यापीठाला भेट देणार आहेत. या वेळी या शिष्यवृत्तीची घोषणा करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे उपाध्यक्ष जॉन रोझेनबर्ग यांनी सांगितले.