04 March 2021

News Flash

नवोन्मेष : ‘चॅपर्स’ची कोल्हापुरी चप्पल सातासमुद्रापार

घरात व्यवसायाचे वातावरण. वडिलांचा प्रसन्न ट्रॅव्हल्स हा प्रवासी वाहतूक व्यवसाय.

घरातील प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय सोडून केवळ कोल्हापुरी चप्पल वापरण्याची आवड ते स्वत: संशोधन करून ग्राहकांच्या आवडीनुसार कोल्हापुरी चप्पल बनविणारा व्यावसायिक अशी ओळख पुण्याच्या हर्षवर्धन पटवर्धन या तरूणाने निर्माण केली आहे. चॅपर्स इंडियाने पुणेच नव्हे, तर दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, कोलकाता या शहरांबरोबरच स्पेन, इंग्लंड, इस्त्रायल, अमेरिकेतील ग्राहक मिळवून कोल्हापुरी चप्पल खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार पोहोचवली आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धनच्या कल्पनेतून तयार होणाऱ्या कोल्हापुरी चपलांना खुद्द कोल्हापुरातूनही मागणी आहे.

घरात व्यवसायाचे वातावरण. वडिलांचा प्रसन्न ट्रॅव्हल्स हा प्रवासी वाहतूक व्यवसाय. मात्र, हा व्यवसाय आपल्यासाठी नाही, हे ओळखून हर्षवर्धन पटवर्धन या तरूणाने नोव्हेंबर २०१४ मध्ये चॅपर्स इंडिया नावाचे एक छोटे दुकान सुरू केले. कोल्हापुरी चप्पल वापरण्याची आवड असल्याने या आवडीलाच व्यवसायात रूपांतरित करून कोल्हापुरी चपलेला जगभरात पोहोचवण्याचा ध्यास हर्षवर्धनने घेतला आहे. बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही पदवी घेतल्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहम विद्यापीठात मास्टर्स इन मॅनेजमेंट ही पदवी घेण्यासाठी इंग्लंड येथे हर्षवर्धन गेले. तेथे गेल्यानंतरही कोल्हापुरी चप्पलच वापरायचे. जगभरातून शिक्षणासाठी आलेल्या मित्रांनाही तेथे कोल्हापुरी चपलेबाबत कुतूहल निर्माण झाले. हर्षवर्धन यांनी आपल्या मित्रांसाठी पुण्यातून कोल्हापुरीचे काही जोड मागविले आणि हीच व्यवसायाची नांदी ठरली.

हर्षवर्धन यांचे वडील प्रसन्न पटवर्धन यांचा प्रसन्न ट्रॅव्हल्स हा व्यवसाय. परदेशातून पदवी घेऊन आल्यानंतर हर्षवर्धन यांनी वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरूवात केली. मात्र, आपल्याला ज्या व्यवसायातील कळत नाही, तेथे बॉसचा मुलगा म्हणून गेली कित्येक वर्षे व्यवसायात असलेल्या वडिलांवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आपल्या कल्पना लादायच्या, हे हर्षवर्धन यांच्या मनाला काही पटेना. त्यामुळे आपल्या व्यवसायातील उत्पादनाला जगभरात पोहोचवता आले पाहिजे, या उद्देशाने त्यांनी विविध व्यवसायातील कल्पनांवर संशोधन सुरू केले. तेव्हा कोल्हापुरी चप्पललाच जगभर घेऊन जाण्याची कल्पना पुढे आली.

घरातील व्यवसायाच्या निमित्ताने देशातील विविध शहरांत फिरतानाच कोल्हापुरी चपलेला लागणाऱ्या कच्च्या मालाची माहिती घेण्यास सुरूवात केली. चेन्नई, बेंगळुरू, मुंबई, कोलकाता या शहरांमधून लेदरपासून चप्पल कशी बनविली जाते, ही प्रक्रिया त्यांनी समजून घेतली. मात्र, चप्पल, बुट यांचे बलाढय़ ब्रॅण्ड्स बाजारात आहेत. शिवाय टोचते, पाय घसरतो, पारंपरिक कपडय़ांवरच छान दिसते, अशा कोल्हापुरी चपलांबाबतच्या मर्यादा होत्याच. त्यामुळे लेदर आणखी आकर्षक होऊ शकेल का?, कोल्हापुरी चप्पल घालण्यास योग्य आणि मऊ होऊ शकते का, या पद्धतीने हर्षवर्धन यांनी लेदरवर संशोधन सुरू केले. त्याकरिता चेन्नई, कानपूर, आग्रा, कोलकाता अशा विविध शहरांमधील लेदरच्या कारखान्यांमध्ये स्वत: जाऊन माहिती घेतली. मऊ लेदरपासून जॅकेट तयार केले जाते. त्याच लेदरपासून कोल्हापुरी चप्पल तयार करायचे त्यांनी ठरवले आणि थेट कोल्हापूर गाठले. तेथील कारागीरांकडून त्यांनी कोल्हापुरी चप्पलचे काही जोड तयार करून घेतले. हिरव्या, निळ्या, लाल रंगाच्या कोल्हापुरी चपला पुण्यात आणल्यानंतर त्या मित्रांनाच विकल्या. त्यांना आवडल्यानंतर त्यांच्या परिचयाच्या लोकांनी मागणी केली. अशा पद्धतीने नव्या ढंगातल्या कोल्हापुरी चपलेला मागणी सुरू झाली. पुढे कोल्हापुरातून काही कारागीर पुण्यात आणले आणि २०१५ मध्ये शनिवार पेठेतील एक छोटय़ा जागेत चॅपर्सचे कार्यालय आणि त्या जोडीला संकेतस्थळ सुरू केले. त्याबरोबरच फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा समाजमाध्यमांतून प्रसार करण्यास सुरूवात केली. कारण जाहिरात करण्यासाठी पैसेच नव्हते. ग्राहकांचा ओघ वाढल्यानंतर २०१६ मध्ये एरंडवण्यात नवे दुकान सुरू केले आणि पहिल्याच वर्षांत पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सप्टेंबर २०१७ मध्ये औंध येथे दुसरे दुकान सुरू करण्याता आले.

चॅपर्स इंडियामध्ये पारंपरिक कोल्हापुरी चप्पल, मऊ लेदरच्या आणि रंगीत, आकर्षक व कोणत्याही कपडय़ांवर घालता येणाऱ्या असे तीन विभाग करण्यात आले आहेत. सर्व प्रकारांमध्ये विविध डिझाइन उपलब्ध आहेत. याबरोबरच कॉबलर्स हा नवा ब्रॅण्ड सुरू करण्यात आला आहे. ग्राहकाच्या पायाचे माप घेऊन पायाचा साचा तयार केला जातो. तसेच, ग्राहकांच्या मागणीनुसार विविध प्रकारच्या लेदरमध्ये चप्पल तयार करून दिली जाते. त्याचबरोबर बूट आणि चप्पलला मॅचिंग म्हणून पैसे ठेवायचे पाकीट, कमरेचा बेल्ट आणि महिलांच्या पर्स बनविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पारंपरिक डिझाइनबरोबरच कोल्हापुरी चपलेमध्ये वर्षभर वापरता येण्यासाठी नवनवीन डिझाइन तयार आहेत. हर्षवर्धन आणि प्रतीक हातवळणे हा व्यवसाय पाहतात. पुण्याचे काम प्रतीक पाहतात.

‘व्यवसायाला सुरूवात केली तेव्हा फारच बिकट परिस्थिती होती. कल्पना पूर्णत: नवीन होती. फुटवेअर इंडस्ट्रीमधील काहीच माहिती नव्हती. नवीन डिझाइन आले की समाजमाध्यमांवर आणि संकेतस्थळावर टाकणे आणि मागणीची वाट पाहणे एवढेच काम होते. दोन – चार ऑर्डर आल्या की चपला तयार करून पोहोच करायचो. कालांतराने परिस्थितीत बदल होत गेला. आता पुण्याबरोबरच मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद अशा देशातील विविध शहरांमधूनही मागणी येते. विशेष म्हणजे कोल्हापूर शहराचे वैशिष्टय़ असणाऱ्या आणि पुण्यात तयार होणाऱ्या कोल्हापुरी चपलेला खुद्द कोल्हापुरातूनही मागणी आहे. वडिलांनीही स्वत: शून्यातून व्यवसाय सुरू केला. त्यामुळे कोणताही व्यवसाय छोटा – मोठा नसतो. व्यवसायाची क्षमता, प्रमाण कमी – जास्त असू शकते, हे वडिलांचे ब्रीद घेऊनच व्यवसायात उतरलोय’, असे हर्षवर्धन सांगतात.

चालू वर्षांत कोरेगाव पार्क आणि मुंबईला नवी दुकाने सुरू करण्याचा मानस आहे. याबरोबरच येत्या सहा महिन्यात पायाला अत्यंत आरामदायी वाटणारी कोल्हापुरी चप्पल तयार करण्याचा मानस आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून इस्त्रायल, स्पेन, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड येथून मागणी आहे. मात्र, पुढील वर्षीपासून मोठय़ा प्रमाणात चप्पल पाठविण्याचा मानस आहे. समाजमाध्यमांतून चॅपर्सला इतका प्रतिसाद मिळाला, की खरे म्हणजे फेसबुकनेच चॅपर्सला उभे केले, अशी भावना हर्षवर्धन यांची आहे.

prathamesh.godbole@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 4:29 am

Web Title: harsh vardhan patwardhan kolhapuri chappal
Next Stories
1 प्रेरणा : बोल कायद्याचे
2 जिग्नेश मेवानी आणि उमर खालिद यांची भाषणे पाहून कायद्यानुसार कारवाई होणार : सेनगावकर
3 पिंपरी-चिंचवड: मद्यधुंद अवस्थेतील टोळक्याकडून वाहनांची तोडफोड
Just Now!
X