कोटय़वधी रुपयांचा कर चुकविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या हसन अली खान याला पुण्यात पासपोर्ट कार्यलयास खोटी माहिती दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्य़ात वर्ग करून सोमवारी अटक करण्यात आली. त्याचा चतु:शृंगी पोलिसांनी जबाब नोंदवून त्याच्या हस्ताक्षराचे नमुने घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने त्याचा ताबा पुन्हा मुंबई पोलिसांकडे देण्यात आला आहे.
पुणे पासपोर्ट कार्यालयास पासपोर्टच्या नूतनीकरणा वेळी खोटी माहिती दिल्याप्रकरणी अली विरुद्ध २२ डिसेंबर २०११ रोजी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकारी शकुंतला राणे यांनी तक्रार दिली होती. अली हा ऑर्थर रोड कारागृहात सध्या आहे. या ठिकाणी जाऊन चतु:शृंगी पोलिसांनी चौकशी केली होती. त्याला पुण्यातील गुन्ह्य़ात वर्ग करावे म्हणून मुंबई येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार त्याला या गुन्ह्य़ात मुंबई पोलीस घेऊन आले. सोमवारी सकाळी शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर अलीला हजर करून त्याचा ताबा चतु:शृंगी पोलिसांनी घेतला. त्याचा जबाब, हस्ताक्षराचे नमुने घेऊन त्याला पुन्हा सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. अलीची मंगळवारी मुंबई येथील न्यायालयात तारीख असल्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचा ताबा मुंबई पोलिसांना दिला, अशी माहिती चतु:शृंगी पोलिसांनी दिली.
हसन अली हा २००३ मध्ये लंडनला गेला होता. या ठिकाणी त्याने आपला पासपोर्ट हरल्याची तक्रार भारतीय दूतावासाकडे केली होती. त्या वेळी भारतीय दूतावासाकडून त्याला एक तात्पुरता पासपोर्ट देण्यातस आला होता. त्या पासपोर्टवर अली हा पुण्यात आला. त्यानंतर त्याने पासपोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी संपर्क साधला. त्या वेळी त्याने पत्नीचा हैदराबाद येथील पत्त्याचा पुरावा दिला होता. यावर पुणे पासपोर्ट कार्यालयाकडून त्याला २००४ मध्ये पासपोर्ट देण्यात आला. त्यानंतर ईडीने अलीला अटक केली. त्या वेळी त्याच्याकडे अनेक पासपोर्ट असल्याचे आढळून आले. त्याच बरोबर पुण्याचा पासपोर्टवर दिलेला पत्त्याच्या वेळी त्याने पत्नीशी तलाक घेतला होता. त्यामुळे पासपोर्ट कार्यालयास खोटी माहिती दिल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलीस निरीक्षक सुभाष निकम यांनी सांगितले, की अली याच्या हस्ताक्षराचे नमुने व त्याचा जबाब घेण्यात आला. हस्ताक्षराचा नमुना व पासपोर्ट वरील सही हे तज्ञ्जाकडून पडताळून पाहण्यात येणार आहे.