पुण्यातल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर भागात मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाच्या पोटात मारल्याने मृत्यू झाला आहे. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. गोविंद गार्डन ते कोकणे चौक या रस्त्याच्या पदपथावर ही घटना घडली, नाझिम शेख असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे आहे. त्याचा साथीदार दीपक जगतापला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्या माणसाने नाझिमला ठोसा मारला तो मात्र फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एक माणूस त्याची सायकल उभी करून मोबाईलवर बोलत होता. तेवढ्यात दुचाकीवरून नाझिम शेख आणि त्याचा साथीदार दीपक जगताप हे दोघे तिथे बाईकवरून आले. त्यांनी मोबाईलवर बोलणाऱ्या माणसाला हटकले, एवढंच नाही तर मोबाईल हिसकावण्याचाही प्रयत्न केला.  ज्यानंतर दोघांमध्येही झटापट झाली, या झटापटीत मोबाईलधारकाने नाझिमच्या पोटात जोरदार ठोसा मारला. ज्यामुळे नाझिम खाली कोसळला. तसेच त्याने आणलेली दुचाकीही त्याच्या अंगावर पडली, हे पाहून मोबाईलधारक इसम घाबरला आणि तिथून पळून गेला.
नाझिमचा साथीदार दीपक जगताप याने तातडीने नाझिमला रूग्णालयात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.  नाझिम शेख याचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता, ज्यात त्याच्या पोटाला जखम झाली होती. नाझिम आणि त्याचा साथीदार दीपक हे दोघेही दारू पिऊन गाडी चालवत होते, नाझिमला चालताही येत नव्हते, त्यामुळे मी गाडी चालवत होतो अशी माहिती दीपकने पोलिसांना दिली आहे. हे दोघेही औंध येथील मुरकुटे वस्तीत राहातात. आता याप्रकरणी सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.