हळदीचे दूध गुणकारी असल्याचे वर्षांनुवर्षे आपल्याला माहिती आहे. मात्र, परदेशातील बाजारपेठेतून ‘टर्मरिक लाते’ म्हणून ते विक्रीला आल्यानंतर आपल्याला त्याची महती कळते. हा दृष्टिकोन चुकीचा आहे. आपल्या कु टुंबाचा परंपरागत आहारच सर्वोत्तम आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या कार्यक्रमात सोमवारी केले.

करोना संकटकाळात काय खावे, कसे खावे, किती प्रमाणात खावे, अशा प्रश्नांना दिवेकर यांनी ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या कार्यक्रमात दिलखुलास उत्तरे दिली. ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी प्रास्ताविक केले. ‘लोकसत्ता’च्या फीचर एडिटर आरती कदम यांनी दिवेकर यांच्याशी संवाद साधला. स्वाती केतकर-पंडित यांनी वाचकांचे प्रश्न विचारून त्यांची उत्तरे दिवेकर यांच्याकडून जाणून घेतली. करोनाकाळात रोगप्रतिकारकशक्ती हा परवलीचा शब्द झाला आहे. किमान अर्धा तास व्यायाम, घरी केलेले पौष्टिक अन्न आणि शांत झोप हा क्रम नेहमी पाळला तर रोगप्रतिकारकशक्ती उत्तम राहते, असे दिवेकर यांनी सांगितले. स्थानिक शेतकऱ्याने पिकवलेले, त्या त्या मोसमात उपलब्ध होणारे आणि आपल्या स्वयंपाकघरात शिजणारे पदार्थ सर्वाच्या उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे त्या म्हणाल्या.

सध्या घरातून काम करणाऱ्या पुरुषांनी स्वयंपाकघरातील कामही शिकावे. कामाच्या ठिकाणी वापरला जाणारा ‘बघा आणि शिका’ हा दृष्टिकोन घरीही अमलात आणावा. रोज किमान अर्धा तास स्वयंपाकघरात काम के ल्यास त्याचे आरोग्यावर चांगले परिणाम झालेले दिसतील, असा कानमंत्र त्यांनी दिला.

पोहणे, वाहन चालवणे हे जसे कौशल्य आहे, तसेच स्वयंपाक करता येणे हेही जीवनावश्यक कौशल्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने ते आत्मसात करणे आवश्यक आहे. घरी स्वयंपाक करून खाणे जेवढे कमी होईल तेवढे आरोग्याचे प्रश्न वाढतील. पाकीटबंद पदार्थाचे सेवन जेवढे जास्त होईल, तेवढा वजनाच्या काटय़ावर दिसणारा आकडाही वाढेल, असा इशारा दिवेकर यांनी दिला.

घरातून काम करताना कमीत कमी पाच सूर्यनमस्कार आणि अर्धा तास आवडीचा व्यायाम करावा. त्या त्या मोसमात उपलब्ध असलेले एक फळ रोज खावे. घरातील ज्येष्ठ मंडळींनी त्यांच्या आई-आजीकडून ऐकलेले आहारविषयक ज्ञान आणि माहिती टिपून ठेवावी. नव्या पिढीने त्यांचे ऐकले नाही तरी चालेल, मात्र आजी-आजोबांनी नव्या पिढीच्या आहारविषयक सल्ल्यांना जुमानू नये, असे सांगून दिवेकर यांनी पारंपरिक आहाराचे महत्त्व स्पष्ट केले.

आहारशैली अशी हवी!

पुरुष :

– वेळेवर भोजन, झोप, अर्धा तास नियमित व्यायाम आणि फालतू गोष्टींचे दडपण न घेणे या चार गोष्टींचा अवलंब करावा.

– वरण-भात, भाजी-पोळी, चटणी-कोशिंबीर असा आहार घ्यावा.

– सायंकाळी भूक लागल्यास पोहे, उपमा, घावन, थालीपीठ खावे.

महिला :

– मूठभर शेंगदाणे, सकाळी बदाम खाल्ले पाहिजेत.

– नाचणी, ज्वारी आणि थंडीमध्ये बाजरीचे सत्त्व भाकरी, लाडू यांद्वारे घ्यावे.

– हंगामानुसार फळे खाणे आवश्यक

– सुरण आणि रताळे आठवडय़ातून दोनदा तरी खावे.

– शिजवण्यासाठी, खाण्यासाठी, पचविण्यासाठी सोपा असलेला भातही खावा

आजी-आजोबा :

– ज्येष्ठांनी आपल्याकडील ‘आहाराचे शहाणपण’ लिखित स्वरूपात पुढील पिढीकडे हस्तांतरित करावे.

– तूप वगळून ऑलिव्ह ऑइल, साखर वगळून चहा घेणे योग्य होणार नाही.

– नाचणीचे सत्त्व, केळे, सुकामेवा पावडर दुधातून घेणे योग्य.

– गर्दी नसेल अशा ठिकाणी फिरायला जाणे प्रकृतीसाठी चांगले.

अ‍ॅड इज बॅड’

बालकांसह पौगंडावस्थेतील मुला-मुलींमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. त्यासाठी विद्यार्थी वर्गाने जंक फूडवर बंधन घातले पाहिजे. ‘काही तरी मागव आणि खा’ असे सांगत अनेकदा पालकच मुलांना प्रोत्साहन देतात. ‘अ‍ॅड इज बॅड’ हे ध्यानात ठेवावे. जाहिरात होते ते सगळेच चांगले नसते. परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले म्हणून मुलांना चॉकलेट देता कामा नये. प्लास्टिकमधून खाणे सोडले पाहिजे. दोन मिनिटांत होणारे खाण्यापेक्षा दहा मिनिटांमध्ये होणारे खाल्लेले चांगले, असा सल्ला दिवेकर यांनी दिला.

आरोग्यवर्धक सल्ला

* प्रत्येक ठिकाणचा आहार वेगळा आहे. आहाराची विविधता जपली पाहिजे.

* आपला पारंपरिक आहार सोडून पाश्चात्त्य आहार घेतो तेव्हा मधुमेह, लठ्ठपणा, रक्तदाब यांसारखे विकार होतात.

* चहाबरोबर बिस्किट खाल्ले तर मधुमेह कधीच नियंत्रित राहणार नाही.

* भात, केळे, नारळ, काजू, शेंगदाणे यामुळे तणाव कमी होऊ शकतो, झोप चांगली लागली तर तणाव कमी होण्यास मदत होते.

* कुळीथ खाणे हा मुतखडय़ावर चांगला उपाय आहे.  साखर, आले, दूध घालून नियमित चहा दोन-तीन वेळा घेतला पाहिजे. भूक मारण्यासाठी चहा घेतला तर अपायकारक.

* अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी वेळेवर खाण्याची सोय करावी. त्यांच्याकडे केळी, पाण्याची बाटली, शेंगदाणे-गूळ जवळ पाहिजे. पोळी, तूप-गूळ बरोबर असेल तर उत्तम.