गरिबीची लढाई ही हातात लेखणी घेऊनच संपवता येईल, असे मत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव शौराज वाल्मीकी यांनी केले. पुणे शहर जिल्हा काँग्रेस अंतर्गत राष्ट्रीय मजदूर संघ आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन वाल्मीकी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राज्याचे क्रीडा मंत्री पद्माकर वळवी, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनिल शिंदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड, क्लबचे हेमंत नाईक, श्रीकांत सोनी आदी उपस्थित होते.
वाल्मीकी म्हणाले, महिलांची आरोग्य तपासणी घेऊन समाजात एक चांगला संदेश गेला आहे, लायन्स क्लबचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. राहुल गांधी यांनी गरिबांसाठी काम करण्याचे व केंद्राच्या विविध योजनांचा फायदा देशातील सामान्य घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे पुणे काँग्रेसने ठेवले आहे. अशी कामे सर्वानी करावी.
पद्माकर वळवी म्हणाले, राज्य शासन विविध योजना गरिबांना केंद्रबिंदू मानून तयार करत आहे. गरीब महिलांसाठी घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महात्मा गांधी जयंती सप्ताहानिमित्त महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली हीच खरी महात्मा गांधीना आदरांजली आहे.