चालू महिन्याच्या पहिल्या सातच दिवसांत शहरात डेंग्यूचे दहा संशयित रुग्ण सापडले आहेत. जूनमध्ये शहरात काही दिवस पडून गेलेल्या पावसानंतर पुन्हा तीन आठवडे म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. असे असतानाही डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र आहे.
जानेवारीपासून आतापर्यंत शहरात डेंग्यूचे ४८ संशयित रुग्ण सापडले असून त्यातील ११ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या चाचणीत निष्पन्न झाले. मार्च, एप्रिल आणि मे मध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या नगण्य होती. एकूण संशयित डेंग्यूरुग्णांपैकी २१ रुग्ण केवळ जून आणि जुलैच्या पहिल्या सात दिवसांत सापडले. ७ जुलैला शहरात डेंग्यूचे ३ संशयित रुग्ण सापडले आहेत.
पावसाचे पाणी साठू लागल्यानंतर डेंग्यूचे रुग्ण सापडण्यास सुरुवात होते, त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत डेंग्यूच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे पालिकेचे कीटक प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘जानेवारीपासून डेंग्यूचे ४८ रुग्ण सापडले असले, तरी ते संशयित रुग्ण असून त्यातील ११ जणांना डेंग्यू झाल्याचे एनआयव्ही तपासणीत समोर आले. जुलैत डेंग्यूचे २ रुग्ण आढळले आहेत. घरात पाणी साठवल्यास दिवसाआड बदलावे, तसेच ते घट्ट झाकण लावून ठेवावे. घराच्या आजूबाजूला, गच्चीवर किंवा ताडपत्रीवर पाणी साचू न देणे तसेच घरातील फ्लॉवरपॉटसारख्या भांडय़ांमध्ये पाणी साठून डास वाढू न देणे असे प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक आहे.’