विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने जमणाऱ्या नागरिकांमध्ये आरोग्याचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न पुण्यातील डॉक्टरांच्या संघटनेकडून केला जाणार आहे. मुख्य मिरवणुकीत मानाच्या चौथ्या, तुळशीबाग मंडळाच्या गणपतीसोबत या डॉक्टरांचा आरोग्यरथ राहणार असून, त्याद्वारे ‘स्वच्छतेतून आरोग्य’ असा संदेश दिला जाणार आहे.
पुणे डॉक्टर्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने समाजाच्या आरोग्यासंबंधी अनेक उपक्रम राबविले जातात. स्वच्छ शाळा उपक्रम, आरोग्य शिबिरे, व्याख्याने, औषधांचे वितरण अशा उपक्रमांचा त्यात समावेश आहे. त्याचाच एक भाग म्हणून ट्रस्टतर्फे गणेश विसर्जन मिरवणुकीत आरोग्यरथ तयार केला जातो. या वर्षीही मिरवणुकीत रथ सहभागी होणार असून, त्याद्वारे पुणेकरांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले जाणार आहे. त्यासाठी पथनाटय़, मंगळागौर, विविध घोषणा यांचे नियोजन केले जाणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संताजी कदम यांनी दिली.
स्वच्छतेबरोबरच मुलगी वाचवा हा संदेशही या वेळी दिला जाणार आहे. त्यासाठी डी.वाय. पाटील नॉलेज सिटीचे विद्यार्थी या रथामध्ये सहभागी होणार आहेत. ‘स्वच्छतेच्या माध्यमातून सुंदर पुणे’ यासाठी या वर्षीचा रथ तयार करण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास मंडई येथून या रथाची यात्रा सुरुवात होईल. त्यासाठी खासदार अनिल शिरोळे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र जगताप आदी उपस्थित राहणार आहेत, असेही डॉ. कदम यांनी सांगितले.