पुणे जिल्ह्यातील ओतूर पोलीस ठाण्यात एक आगळावेगळा कार्यक्रम पाहायला मिळाला. एका गर्भवती महिला पोलीस कर्मचाऱ्याची ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वैशाली नामदेव मुखेकर असं महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्यांना ही आपण कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस ठाण्यात असा काही कार्यक्रम होईल असे वाटले नव्हते. मात्र, त्यांना आईवडिल नसल्यानं पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांनी त्यांची ओटी भरण्याचा कार्यक्रम पोलीस ठाण्यात घेत कौटुंबिक जबाबदारी पार पाडली. या अनपेक्षित आणि सुखद धक्क्यामुळे वैशाली मुखेकर भावनिक झाल्या.

वैशाली नामदेव मुखेकर या गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील ओतूर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. वैशाली या गर्भवती असून, आजही त्या ओतूर पोलीस ठाण्यात येऊन कर्तव्य बजावतात. दरम्यान, १३ वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, तर दोन वर्षांपूर्वी आई देखील साथ सोडून देवाघरी गेली. हे सर्व महिला पोलीस कर्मचारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांना माहित होते. त्यामुळे त्यांनी ओटी भरण्याचा कार्यक्रम घ्यायचे ठरवले. कर्मचारी मनीषा मुकुंद ताम्हाणे आणि भारती आनंदा भवारी यांनी तयारी केली.

येरवी पोलीस ठाण्यात गुन्हेगारांची ने-आण किंवा तक्रारीचा पाढा वाचण्यासाठी अनेक जण येतात. आज मात्र, ओटी भरणीच्या कार्यक्रमाने ओतूर पोलीस ठाणे आनंदीमय झाल्याचे पाहायला मिळाले. अनेक महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी गणवेश न घालता आपल्या मैत्रिणीसोबत काही क्षण आनंदात घालवावेत या हेतूने पारंपरिक साडी परिधान केली होती. या सर्व कार्यक्रमामुळे वैशाली यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये उखाणा घेण्याची स्पर्धा लागली होती. दरम्यान या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना वैशाली नामदेव मुखेकर म्हणाल्या की, “पोलीस ठाण्यात ओटी भरणीचा (डोहाळे जेवण) कार्यक्रम ठेवण्यात आला आहे हे माहीत नव्हतं. वडिलांचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले. आईही दोन वर्षांपूर्वी देवाघरी गेली. ‘आई नाही तर काही नाही’ अस म्हटलं जातं. आई नसल्याने मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. सुखद धक्का दिला. यामुळे मी खूप आनंदी झाले. घरी असा कार्यक्रम होणारच नाही अस वाटत होतं. तरी देखील पोलीस ठाण्यात झाला याचा आनंद आहे. असा कार्यक्रम होणार हे पहिलंच पोलीस ठाणे असावं. प्रत्येक पोलीस ठाण्यात असे कार्यक्रम करणे गरजेचे आहेत,” असं ही त्या म्हणाल्या.

त्यांच्या आनंदात आमचं समाधान

पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे हे म्हणाले, “वैशाली यांना आईवडिल नाहीत. पोलीस ठाणे हेच कुटुंबाप्रमाणे आहे. त्यामुळं हा कार्यक्रम आम्ही घेतला. त्यांना खूप आनंद झाला. यामध्येच आम्हाला समाधान आहे. एक कुटुंब म्हणून असे कार्यक्रम करायला हरकत नाही. कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी असतील त्या सोडवल्या पाहिजेत. भावनिक बांधिलकी ठेवावी अस माझं प्रामाणिक मत आहे,” असे ते म्हणाले.