03 June 2020

News Flash

असह्य़ उकाडा आणि वीज गायब एकत्रच!

सह्य़ उकाडा आणि वीज गायब हे दोन्ही एकत्रच आले की काय परिस्थिती होते, याचा अनुभव गुरुवारी जवळपास निम्म्या शहरातील पुणेकरांनी घेतला.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

घरात वीज असली की उकाडय़ाची चिंता नसते किंवा उकाडा नसेल, तर काही वेळेला वीजबंदही सहन केली जाते. पण, असह्य़ उकाडा आणि वीज गायब हे दोन्ही एकत्रच आले की काय परिस्थिती होते, याचा अनुभव गुरुवारी जवळपास निम्म्या शहरातील पुणेकरांनी घेतला. यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी वीज बंद ठेवण्याच्या गुरुवार या हक्काच्या दिवसाचे निमित्त साधून महावितरण कंपनीने पुणे व िपपरी- चिंचवड शहरातील विविध भागात सात ते आठ तास वीज बंद ठेवून पावसाळ्यापूर्वीची कामे केली. मात्र, जवळपास ४० अंश सेल्सिअस तापमान असताना गुरुवारच्या या बंदने पुणेकरांचा चांगलाच घाम निघाला.
वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी महावितरण कंपनीला नियमानुसार गुरुवारचा दिवस देण्यात आला आहे. इतर वेळेलाही वेगवेगळ्या कारणांनी वीज गायब होत असली, तरी पूर्वनियोजित कामांसाठी गुरुवारचा वापर करून आठ तासांपर्यंत वीज बंद ठेवून कामे केली जातात. त्यासाठी ग्राहकांना पूर्वसूचना देणेही गरजेचे असते. त्यामुळे या वीजबंदबाबत वर्तमानपत्रांच्या माध्यमातून जाहिरातीही देण्यात येत असतात. पावसाळ्यात वादळ किंवा इतर कारणांनी वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी देखभालीची कामे केली जातात. या कामांना सध्या सुरुवात करण्यात आली असल्याने गुरुवारच्या हक्काच्या दिवसाचा वापर करण्यात येत आहे.
मागील गुरुवारी मध्यवर्ती पेठांतील काही भागातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. या गुरुवारी मात्र सात ते आठ तासांपर्यंत निम्म्या शहरातील वीज बंद होती. डेक्कन, शिवाजीनगर, कर्वेनगर, डहाणूकर कॉलनी, कोथरूड, औंध, पाषाण, खडकी, वाकडेवाडी, रविवार व बुधवार पेठ, लष्कर परिसर, घोडपडी गाव, कवडे रस्ता परिसर, बालेवाडी, घोले रस्ता, शिरोळे रस्ता, प्रभात रस्ता, आपटे रस्ता परिसर, शास्त्रीनगर, डावी भुसारी कॉलनी, माळवाडी, पद्मावती, आंबेगाव पठार, कात्रज, धनकवडी, पाटील इस्टेट, खडकवासला, निगडी, भोसरी, चऱ्होली, चिखली, सांगवी, दापोडी, यमुनानगर, खराळवाडी आदी विविध भागातील वीज सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.
शहराचे तापमान गुरुवारीही जवळपास ४० अंश सेल्सिअस होते. त्यातच गुरुवारी काही प्रमाणात आकाशही ढगाळ होते. त्यामुळे हवामानातील दमटपणा कमालीचा वाढला होता. अशा स्थितीत घरात वीज नसल्याने दुपारी असह्य़ उकाडय़ाने वीज बंद असलेल्या भागातील नागरिकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागले. मात्र, पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी ही कामे गरजेची असल्याचे स्पष्टीकरण महावितरण कंपनीकडून देण्यात आले.
गुरुवारच्या वीजबंदमधून सुटका कधी?
आठवडय़ातील एक दिवस वीजयंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महावितरण कंपनीला नियमानेच मिळाला आहे. मात्र, शहराचे महत्त्व व विजेची गरज लक्षात घेता पर्यायी व्यवस्था निर्माण करून एकही दिवस वीजबंद न ठेवता देखभाल व दुरुस्ती करता येणे शक्य असते. मुंबईसारख्या शहरामध्ये अशाच पद्धतीने वीजयंत्रणेची देखभाल- दुरुस्ती केली जाते. पुणे शहरातही एकही दिवस वीज बंद न ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबई वगळता महावितरण वीजपुरवठा करीत असलेल्या सर्वच विभागात सर्वोच्च स्थानावर पुणे शहर आहे. वीज गळती व चोरीचे प्रमाणही पुण्यात राज्याच्या तुलनेत सर्वात कमी आहे. त्यामुळे पुणे शहराची गुरुवारच्या वीजबंदमधून सुटका करण्यासाठी उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2016 3:35 am

Web Title: heat electricity disappeared
टॅग Electricity
Next Stories
1 उद्घाटन झाले; पण त्रुटी मात्र तशाच
2 वृक्षारोपणासाठी महाविद्यालये जागेच्या शोधात
3 मे-जूनमध्ये पारपत्र महामेळावा!
Just Now!
X