News Flash

Cyclone Fani: ‘फॅनी’ चक्रीवादळ ओसरल्यानंतर राज्यात उन्हाचा कहर कमी होणार

राज्यातील उन्हाचा कहर कमी होणार

'फॅनी' चक्रीवादळ

Cyclone Fani : हवामान शास्त्रज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी यांची माहिती

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या ‘फॅनी’ चक्रीवादळाचा प्रभाव राज्यावर होऊन उष्णतेची लाट आली होती. हे वादळ दोन दिवसांमध्ये जमिनीवर येणार असून, तीव्रता कमी होऊन ते नष्ट होईल. त्यानंतर राज्यातील उन्हाचा कहर कमी होईल. कमाल आणि किमान दोन्ही तापमान सरासरीच्या आसपास राहतील, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ आणि इंडियन मेट्रोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिली.

एप्रिल महिन्यातील शेवटचे दिवस पुण्यासह राज्यासाठी अत्यंत उष्ण ठरले. गेल्या कित्येक वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. वातावरणातील कोणत्या बदलामुळे ही स्थिती निर्माण झाली, हे जाणून घेण्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांनी ही माहिती दिली. संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील त्या वेळी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, की जागतिक तापमानवाढीचा (ग्लोबल वॉर्मिग) परिणाम सर्वत्र जाणवतो आहे. देशातील हवामानातही काही बदल झाले आहेत. यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र झाला आहे. शहरीकरण, पर्यावरणाचा ऱ्हास, वृक्षतोड आदींमुळेही कमाल तापमानात वाढ होते आहे. २४ ते २८ एप्रिलला राज्यात तापमान वाढले. ते २९ एप्रिलपासून कमी होत आहे. चक्रीवादळ नष्ट झाल्यानंतर ते सरासरीच्या आसपास येईल.
भारतीय हवामान विभागाच्या वतीने तालुकास्तरावरील हवामानाच्या बदलांचा अभ्यास करून अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, असा दावा करून कुलकर्णी म्हणाले, की हवामान विभागासह राज्यात आणि देशात सध्या खासगी हवामान संस्थांनी काम सुरू केले आहे. त्याचा फायदा नागरिक आणि शेतकऱ्यांना होऊ शकतो.

त्यामुळेच दुष्काळसदृश स्थिती..

भारतात पावसाच्या पाण्याच्या नियोजनाची पद्धत इतर देशांच्या तुलनेत तोकडी आहे. त्यामुळेच उन्हाळ्याच्या शेवटी दुष्काळसदृश स्थिती निर्माण होते, असे हवामान शास्त्रज्ञ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. पेरण्या झाल्यानंतर पावसाने दहा ते पंधरा दिवसांची ओढ दिल्यास इतर देशांमध्ये धरणातील पाणी शेतीला दिले जाते. भारतात तशी व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा अंदाज जाहीर केला. त्यात एल निनो चक्रीवादळाचा जास्त प्रभाव नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे यंदा देशात सरासरीच्या जवळपास पाऊस होणार आहे, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 8:57 am

Web Title: heat in environment will come down after cyclone fani
Next Stories
1 पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठा
2 दुचाकीस्वाराचा अपघाती विमा फेटाळणाऱ्या विमा कंपनीला दणका
3 भारती विद्यापीठाच्या तीन विद्यार्थ्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू
Just Now!
X