नागरिकांना खबरदारीचे डॉक्टरांचे आवाहन

पुणे : मार्च महिन्याच्या अखेरीपासून तापमानाचा पारा चाळिशी पार गेल्याने उन्हाचा तडाखा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यापाठोपाठ  हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ाला उष्माघाताचा इशारा दिला असून उन्हाळ्यातील आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले आहे.

दरवर्षी एप्रिलच्या मध्यानंतर पुणे शहरातील तापमानाचा पारा चाळिशी पार जाताना दिसतो, यंदा मात्र मार्च महिन्यापासूनच शहरातील पारा चाळिशीपार जाऊन घामाच्या धारा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उष्णतेचे आजार, हीट स्ट्रोक तसेच उष्माघात (सनस्ट्रोक) यासारखे आजार होण्याचा धोका संभवतो. ज्यांच्या कामाचे स्वरूप फिरतीचे आहे त्यांचा उन्हाच्या झळांशी जास्त संबंध येत असल्याने घशाला कोरड पडणे, चक्कर येणे, थकवा येणे यांसारखी लक्षणे दिसतात.

शरीरातील पाण्याचे तसेच क्षारांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे उन्हात फिरताना, कष्टाच्या कामांसाठी उन्हात वावरताना शरीराचे तापमान वाढणार नाही तसेच पाणी आणि क्षार कमी होणार नाहीत याची खबरदारी घेणे आवश्यक आहे असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, शरीराचे सर्वसाधारण तापमान हे ३७.८ एवढे असते. उन्हाळ्यात बाहेरील तापमानाशी जुळवून घेण्यासाठी शरीरातील पाणी आणि क्षारांचा अतिरिक्त वापर होतो. हे लक्षात ठेवून त्या प्रमाणात शरीराला पाणी मिळेल याची काळजी घ्यावी. शरीरातील पाणी कमी होणे, रक्तदाब, गरगरणे, थकवा येणे अशा तक्रारींचे रुग्ण येण्यास सुरुवात झाली आहे. योग्य प्रमाणात पाणी पिणे, सोडिअम, पोटॅशियम या क्षारांचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी शहाळ्याचे पाणी, लिंबू आणि कोकम सरबत, ताक, पन्हे, घरी केलेले फळांचे ताजे रस यांचा समावेश आहारात करणे आवश्यक आहे.

नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश मराठे म्हणाले, उन्हातील अतिनील किरणांपासून डोळ्यांना इजा होते. उन्हात फिरल्याने डोळे चुरचुरणे, आग होणे आणि कोरडे होणे असा त्रास होतो. त्यांपासून बचाव करण्यासाठी गार पाण्याने डोळे धुवावेत तसेच ल्युब्रिकेटिंग ड्रॉप वापरावे. उन्हात जाताना छत्री किंवा हॅटचा वापर करावा.

बालरोग तज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर म्हणाले, उष्णतेचे प्रमाण वाढल्यानंतर कांजिण्या, गालगुंड यांची साथ आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्यातून होणारा त्रास मोठय़ांच्या तुलनेत लहान मुलांना जास्त होतो. त्यामुळे उन्हाळ्यात मुलांनी भरपूर पाणी पिणे, घरी केलेली सरबते, फळांचे रस पिणे आवश्यक आहे. उसाचा रस सकाळी किंवा संध्याकाळी प्यावा. बाहेर मिळणारी उघडय़ावर कापलेली फळे खाऊ नयेत. तसेच बाहेरील बर्फाचा वापर टाळावा.

उन्हाळ्यात हे करा..

* कामासाठी बाहेर जाणाऱ्यांनी अंगाला चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन लावावे.

* हॅट, स्कार्फ, गॉगल यांचा वापर करावा.

* गार पाण्याने डोळे धुवावे.

* भरपूर पाणी, घरी केलेले ताक, फळांचे रस, सरबते, शहाळ्याचे पाणी प्यावे.

* बाजारातील बाटलीबंद थंड पेये पिऊ नयेत.

* बाहेरील बर्फ, उघडय़ावर कापलेली फळे खाऊ नयेत.