तापमानातील वाढ तीन ते चार दिवस कायम राहणार

पुणे : एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये उष्णतेची तीव्र लाट येऊन पुणेकरांची काहिली झाली. त्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात तापमान खाली येऊन दिलासा मिळाला असतानाच पुन्हा उष्णतेची लाट येऊन उन्हाचे चटके वाढले आहेत. यंदाच्या हंगामातील उष्णतेची ही दुसरी लाट ठरली आहे. पुढील दोन दिवस ही लाट कायम राहणार असन, तीन ते चार दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. दरम्यान, सोमवारी शहरातील किमान तापमानाचा पारा ४१.३ अंश सेल्सिअसवर गेला होता.

शहर आणि परिसरामध्ये निरभ्र आकाशाची स्थिती आणि कोरडे हवामान असल्याने गेल्या तीन ते चार दिवसांपासून कमाल तापमानामध्ये झपाटय़ाने वाढ सुरू झाली. शहरामध्ये तीन ते चार दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली होती. उष्णतेच्या लाटेपूर्वी गेले दोन दिवस तापमानाचा पारा ४० अंशांवर आला होता. सोमवारी तापमानाने चाळिशी ओलांडली. त्याचप्रमाणे सरासरीच्या तुलनेत ते तब्बल ४.६ अंशांनी वाढल्याने उष्णतेची लाट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ातही शहरात उष्णतेची लाट आली होती. त्या वेळी गेल्या तीस ते चाळीस वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद शहरात झाली. दुपारी घराबाहेर पडणे कठीण झाले होते. २३ एप्रिला ४०.३ अंशांवर असलेले कमाल तापमान झपाटय़ाने वाढत जात २६ एप्रिलला ४२.६ अंशांवर आणि २८ एप्रिलला थेट ४३ अंशांवर पोहोचले होते. हे शहरातील उच्चांकी तापमान होते. सरासरीच्या तुलनेत तेही सुमारे ५ अंशांपर्यंत अधिक होते. या काळात रात्रीच्या उकाडय़ातही मोठी वाढ नोंदविली गेली. उष्णतेच्या या लाटेनंतर मे महिन्यातील सुरुवातीला सरासरीच्या तुलनेत तापमान कमी झाले. अगदी ३६ ते ३७ अंशांवर कमाल तापमान आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, हा दिलासा अल्पकाळच ठरला असून, पुन्हा उष्णतेच्या लाटेने नागरिकांची होरपळ सुरू झाली आहे.

पुणे वेधशाळेच्या पुढील सहा दिवसांच्या अंदाजानुसार २१ आणि २२ मेला उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे तापमान ४१ अंश किंवा त्यापुढे राहण्याची शक्यता आहे. २३ आणि २४ मेलाही तापमान ४१ अंशांच्या आसपास राहणार आहे. त्यानंतर २५ आणि २६  मेला कमाल तापमानात काहीशी घट होणार आहे. ही घट फार मोठी असण्याची शक्यता नाही. त्यानंतरही तापमानात चढ- उतार सुरूच राहणार आहेत. ढगाळ स्थितीनंतरच तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट होऊ शकेल.

रात्रीचे तापमान वाढत जाणार

सध्या शहरामध्ये कमाल तापमानाचा पारा वाढलेला असला, तरी रात्री आकाश निरभ्र राहत असल्याने किमान तापमान कमी आहे. सोमवारी शहरात २१.१ अंश किमान तापमानाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत १.९ अंशांनी ते कमी आहे. त्यामुळे सध्या रात्री फारसा उकाडा जाणवत नाही. मात्र, पुढील काही दिवसांत कमाल तापमान काहीसे कमी होणार असले, तरी रात्रीचे किमान तापमान वाढत जाणार आहे. २३ मेपर्यंत २२ अंशांवर, तर त्यानंतर २३ ते २४ अंशांपर्यंत किमान तापमान जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.