देशाचे पंतप्रधान हे आमचेही पंतप्रधान आहेत. मात्र, कुठेही गेले तरी ते काँग्रेसवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने काहीच केले नाही ही त्यांची भूमिका बालिशपणाची आहे. राफेल विमान खरेदी आणि पीएनबीसारखे घोटाळ्यांमुळे केंद्रातील भाजप सरकारची भ्रष्टाचारी वृत्ती समोर आली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारमधील मंत्री प्रकाश मेहतांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे देखील ही बाब अधोरेखित झाली आहे, सरकारच्या भ्रष्टाचारांमुळे जनतेचा आता भ्रमनिरास झाला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. लोकसत्ताच्या कार्यालयातील विशेष वार्तालापात ते बुधवारी बोलत होते.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोलताना चव्हाण म्हणाले, राज्य सरकारला कर्जमाफी देण्याची इच्छा नव्हती. मात्र, विरोधकांच्या दबावामुळे ती जाहीर करावी लागली. कर्जमाफी द्यायची नसली तरी त्यांच्या पिकाला हमीभाव हा द्यायलाच हवा. त्याचबरोबर पिकांचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी उत्पादनाबरोबरच नुकसानीसाठी देखील विमा योजनांची गरज असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले.

केंद्र सरकारची बुलेट ट्रेनची योजनाही फसवी आहे. याच्या मी पूर्णपणे विरोधात आहे. त्यासाठी सुमारे १ लाख कोटींच्या योजनेची माहिती पंतप्रधान देत नाहीत. ती योजना अजूनही कागदावरच आहे, ती कधी पूर्णत्वास जाईल हे कोडेच आहे. मोदी कोणाचेही ऐकत नाहीत, मनानेच निर्णय घेत आहेत. त्यामुळे केवळ काँग्रेसला निशाणा करीत ते जनतेची दिशाभूल करीत असल्याचा थेट आरोप चव्हाण यांनी मोदींवर केला.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीबाबतच्या काँग्रेसच्या रणनितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना चव्हाण म्हणाले, सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये कटूत्व निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले तर याचा आम्हाला फायदा होऊ शकेल. तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सरकारविरोधात न्यायालयीन लढा देणे गरजेचे आहे. मोदींप्रमाणे आम्हालाही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हिंदी भाषेवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. स्थानिक भाषा लोकांशी थेट जोडणारी असल्याने त्याचा वापर वाढला पाहिजे. राहुल गांधींमुळे तरुण व्यक्तीकडे काँग्रेसचे नेतृत्व गेले आहे. त्यामुळे यापुढील काळात शहरी भागातील तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा आमच्यासाठी अजेंड्यावर असणार आहे.

सध्याचे फडणवीस सरकार राज्यातील रोजगाराच्या स्थितीची योग्य माहिती देत नसल्याचा आरोपही त्यांनी लोकसत्ताशी बोलताना केला. कुठल्या शहरात काय, किती आणि कुठली गुंतवणूक झाली याची माहिती सरकार पुरवत नाही, त्यामुळे तरुणांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. बांधकाम क्षेत्रात रोजगार उपलब्ध झाल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र, येथील रोजगार हा कायमस्वरुपी रोजगार नाही, असे चव्हाण यावेळी म्हणाले.

काँग्रेसमध्येही व्होट बँकेचे पॉलिटिक्स होत असल्याचे त्यांनी मान्य केले. मुंबईत काँग्रेसची धुरा संजय निरुपम यांच्याकडे सोपवण्यात आली ती उत्तर भारतीयांच्या मतांसाठी मात्र त्यामुळे मराठी मते काँग्रेसकडून दुरावत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते ग्रामीण भागात तळागळातील लोकांशी संपर्क साधण्यात चांगली मेहनत घेत असल्याचे सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कौतुकही केले.