श्री ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधीवर चंदनउटीतून माउलींचे नृसिंह अवतारातील वैभवी रूप सुरेश गांधी परिवाराने परिश्रम पूर्वक साकारले. श्रींचे वैभवी रूप पाहण्यासह दर्शनास भाविकांनी मंदिरात गर्दी केली. आळंदीत श्री नृसिंह जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला.
नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ आणि माउली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रींचे समाधीवर चंदनउटी लेप लावण्यास चत्रात सुरुवात होते. नृसिंह जयंतीनिमित्त श्रींचे संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार वापरून श्रींचे वैभवी रूप श्रींचे पुजारी सुरेश गांधी, सुधीर गांधी परिवाराने चंदनउटीतून साकारले. आळंदी मंदिरात भाविक, नागरिक, साधक यांनी श्रींचे दर्शनासाठी गर्दी केली होती. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी संस्थानच्या प्रथेप्रमाणे मंदिरात नृसिंह जयंतीचे नियोजन केले.
नृसिंह जयंतीनिमित्त माउली मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत जन्मोत्सवास उत्साहात सुरुवात करण्यात आली. या वेळी वारकरी शिक्षण संस्थेतर्फे माउली महाराज िशदे यांचे कीर्तन झाले. मंदिरात प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक व दुधारती झाली.
दरम्यान, भाविकांच्या पूजा आणि दर्शनास गाभारा मोकळा करण्यात आला. त्यानंतर साडेपाचचे सुमारास चंदनउटी दर्शन खुले झाले. श्रीनृसिंह जन्मोत्सवानिमित्त श्रींना वैभवी पोशाख करण्यात आला. जन्मोत्सव कीर्तन, आरती, महानवेद्य, प्रसाद वाटप, मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले.
विविध वस्त्रालंकार, आभूषणे आणि नयनमनोहर पुष्प सजावटीने साकारलेले श्रींचे लक्षवेधी रूप भाविकांनी आपल्या नेत्रात साठविले. धूपारती झाल्यानंतर रात्री मानकरी संतोष मोझे यांचे वतीने जागर झाला. मंदिरात व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रींचे चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे, श्रीधर सरनाईक, संजय लवांडे, संजय रणदिवे, सोमनाथ लवंगे, महेश गोखले आदींनी मंदिरातील विविध व्यवस्थांचे तसेच भाविकांसाठीच्या दर्शनाचे सुरळीत नियोजन केले होते. पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर हेही या विविध कार्यक्रमांना उपस्थित होते.