आठवडाभर दररोज पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज

पुण्याच्या आसपासच्या भागात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाच्या सरींनी दिलेली दिलासादायक हजेरी आणि सातत्याने ढगाळ राहणारे हवामान अशा परिस्थितीत आता पुणेकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. या आठवडय़ात ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने (आयएमडी) दररोज पुणे व परिसरासाठी पावसाचा अंदाज वर्तवला असून सोमवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नैऋत्य मोसमी पावसाचे (मान्सून) रविवारी मध्य अरबी समुद्र, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागात आगमन झाले आहे. मान्सूनच्या रोज होणाऱ्या प्रगतीच्या पाश्र्वभूमीवर आता पुण्यातही पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या दोन आठवडय़ांपासून पुण्याच्या आजूबाजूच्या भागात पावसाच्या सरी पडत आहेत. परंतु शहरात अजून म्हणावा असा पाऊस झालेला नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या, तसेच पुण्याच्या बाहेरच्या भागात आणि शेजारच्या तालुक्यांमध्येही काही ठिकाणी पावसाने हजेरी दिली. पुण्यात सकाळपासूनच हवामान ढगाळ आणि दमट होते तसेच दुपारी आकाशात मळभ होते. लोहगावमध्ये १.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात मात्र काही ठिकाणी झालेल्या पावसाच्या शिडकाव्याखेरीज विशेष पाऊस पडला नाही.

‘आयएमडी’ने पुण्यात सोमवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानंतरही पुढील पाच दिवस पुण्यात पावसाच्या काही सरी पडण्याचा अंदाज आहे. रविवारी पुण्याचे तापमान ३४.१ अंश सेल्सिअस होते. ऊन नसले तरी अजूनही उकाडा जाणवत आहे. या आठवडय़ात पावसाच्या शक्यतेबरोबरच तापमान कमी होऊन २७ ते २८ अंश सेल्सिअसवर उतरण्याची शक्यता आहे.