ऑगस्टमध्ये विसर्गामुळे, तर सध्या पावसाने पूरस्थिती

पावसाच्या यंदाच्या हंगामात पुणे शहरात दोनदा भीषण पूरस्थिती निर्माण झाली. मात्र, सुदैवाने धरणातील विसर्ग आणि शहरातील पाऊस एकाच वेळी नव्हता. त्यामुळे पूरस्थितीची व्यापकता आटोक्यात राहिली. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात धरणातील विसर्गामुळे, तर २५ सप्टेंबरला शहरातील धुवाधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली.

बुधवारी रात्री (२५ सप्टेंबर) शहरात धुवाधार पाऊस झाला. त्यामुळे प्रामुख्याने दक्षिण पुणे आणि सिंहगड रस्ता परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. नाल्याच्या प्रवाहालगतच्या भागाला त्याचा फटका बसला. पाण्याचे मोठे लोट सोसायटय़ांच्या भिंती फोडून आत शिरले. धरणातून मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असल्याची भीती सुरुवातीला नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र, बुधवारी धरण क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अत्यंत अल्प प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असता, तर विसर्गात वाढ होऊन नदीची पातळी वाढून पूरस्थिती व्यापक झाली असती.

ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ामध्ये खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे ४ ऑगस्टला नदीमध्ये ४९ हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता. धरणातून सोडलेल्या या पाण्यामुळे नदीकाठच्या परिसरातील हजारो घरे आणि सोसायटय़ांमध्ये पाणी शिरले होते. वाहने वाहून गेली. शेकडो नागरिकांना स्थलांतरित करावे लागले. मात्र, या वेळी शहरात पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे या पूरस्थितीची व्यापकता वाढू शकली नाही. याच काळात शहरातही धुवाधार पाऊस झाला असता, तर स्थिती आणखी भीषण होऊ शकली असती. दोन्ही वेळच्या पूरस्थितीत हजारो नागरिकांना फटका बसला असला, तरी विसर्ग आणि पाऊस एकत्र नसल्याची बाब सुदैवाचीच ठरली.