पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये रविवारी मुसळधार पाऊस पडला. यंदा मान्सूनच्या काळात अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे धरणांमधील पाणीसाठी कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी पडलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.
रविवारी दुपारपासून पुणे शहरात आणि लगतच्या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळी थोडावेळ विश्रांती घेतल्यांनंतर आठ वाजल्यापासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. थोडी थोडी विश्रांती घेत रात्रभर पाऊस पडत होता.
पुण्याला पाणीपुरवठा कऱणाऱ्या धरणांपैकी टेमघर धरणामध्ये सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत ८४ मिमी पाऊस पडला आहे. खडकवासला धरणामध्ये ६० मिमी, पानशेतमध्ये ३५ मिमी तर वरसगावमध्ये ३४ मिमी पाऊस पडला. यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. खडकवासला प्रकल्पामध्ये सध्या १४ टीएमसी इतका पाणीसाठी शिल्लक आहे. एकूण क्षमतेच्या ४८ टक्केच धरणे भरली आहेत.
गेल्यावर्षी याच काळात धरणांमध्ये २४ टीएमसी इतका साठा होता. रविवारी पडलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात किती वाढ झाली हे येत्या एक ते दोन दिवसांत स्पष्ट होईल.