पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या २४ तासात मुसळधार पाऊस झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली.  इतकेच नाही तर शहरात रस्त्यांवर झाडे कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पवना नदीला पूर आला असून नदी दुथडी भरून वाहते आहे. पवना नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा  इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे केजुबाई धरण हे ओसंडून वाहत असून पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. याचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक हे नदीकाठी जात आहेत. तर केजुबाई धरणावर देखील जाऊन अनेकजण पाण्याच्या मंजुळ आवाजाचा आनंद कानावर घेण्यासाठी गर्दी करत आहे.

शहरातील अनेक घरं  नदीकाठापासून जवळच असल्याचे घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. इतकं नाही तर घरात आलेलं पाणी बाहेर काढतानाही त्यांच्या नाकी नऊ येत आहेत.  या सगळ्या परिस्थितीत लोकप्रतिनिधीं नागरिकांना भेट देऊन फोटो सेशन करण्यात व्यस्त आहेत. पण दरवर्षी तीच अडचण नागरिकांची आहे, आमच्या अडचणी सोडवण्यात लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरत आहेत असे पिंपरीकरांनी म्हटले आहे. शहरातील निगडी, प्राधिकरण, सांगवी, रहाटणी, या ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.