पंधरा ठिकाणी पीएमपी बंद पडल्याने कोंडीत भर

शहरात सोमवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूककोंडी झाली. डेक्कन, जंगली महाराज रस्ता, नगर रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता भागात वाहतूक संथगतीने सुरू होती. दरम्यान, मुसळधार पावसामुळे पीएमपी बस बंद पडण्याच्या घटना घडल्या. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पंधरा ठिकाणी पीएमपी बस बंद पडल्याने कोंडीत भर पडली.

मुसळधार पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. काही भागात झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. खडकवासला धरणातून मोठय़ा प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आल्यानंतर डेक्कन भागातील भिडे पूल वाहतुकीस बंद करण्यात आला. त्यामुळे डेक्कन, जंगली महाराज रस्त्यावर सायंकाळी वाहतूककोंडी झाली. वाहतूककोंडी झाल्याने त्याचा ताण आपटे रस्ता, घोले रस्त्यावरील वाहतुकीवर पडला. या भागातील छोटय़ा गल्ल्यांचा वापर वाहनचालकांनी पर्यायी मार्ग म्हणून केला.

पावसामुळे काही प्रमुख चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे बंद पडल्याने वाहतूककोंडी झाली. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रमुख रस्त्यांवर अतिरिक्त बंदोबस्त ठेवला होता. शहरातील वेगवेगळ्या भागात सायंकाळी पंधरा ठिकाणी पीएमपी बस बंद पडल्या. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडली. पीएमपी बस तेथून नेल्यानंतर कोंडी दूर झाली.

पावसाचे पाणी साठल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठे पाणी साचले होते. या भागात कोंडी झाली होती. मुसळधार पावसामुळे वाहतूक संथगतीने सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.

पावसामुळे एसटी वाहतूक विस्कळीत; रेल्वेच्या गाडय़ांना काहीसा विलंब

राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे सोमवारी एसटीच्या वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले. पुण्याहून मुंबई, ठाणे, दादर, बोरीवली, कोल्हापूर आदी भागात जाणाऱ्या बहुतांश गाडय़ा विलंबाने धावत होत्या. काही गाडय़ांच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. दरम्यान, दिवसभरात एकही रेल्वे रद्द झाली नसली, तरी काही गाडय़ा उशिराने धावत होत्या.

सोमवारच्या पावसामुळे पुणे- मुंबई दरम्यान धावणाऱ्या एसटीच्या गाडय़ांवर प्रामुख्याने परिणाम झाला. त्याचप्रमाणे स्वारगेट, शिवाजीनगर आदी स्थानकातून राज्याच्या इतर भागात जाणाऱ्या गाडय़ांच्या वेळापत्रकावरही काहीसा परिणाम झाला. वेळापत्रकानुसार गाडय़ा सोडण्यात आल्या असल्या, तरी मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे बहुतांश गाडय़ा उशिराने दाखल झाल्या. दुपारनंतर मुंबईबरोबरच ठाणे, दादर आणि बोरीवली मार्गावरील एसटच्या सेवेवर परिणाम जाणवला. पुण्यातही दिवसभर जोरदार पाऊस पडत असल्याने अनेकांनी प्रवास टाळला. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दीही कमी होती. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या. शिवाजीनगर स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ांच्या दहा फेऱ्या रद्द करण्यात आल्या. महाबळेश्वर आणि वाईच्या परिसरात पावसाचा जोर मोठा होता. त्यामुळे या भागातील काही छोटे पूल पाण्याखाली गेल्याने तेथील एसटी गाडय़ांना मोठा बिलंब झाल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, सोमवारच्या पावसामुळे रेल्वेच्या गाडय़ा रद्द झाल्या नसल्या, तरी अनेक गाडय़ा विलंबाने धावत होत्या. पुणे- लोणावळा लोकलच्या काही फेऱ्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्याचप्रमाणे डेक्कन क्वीनसह इंटरसिटी एक्स्प्रेसलाही काहीसा उशीर झाल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले.

लोणावळ्यात चोवीस तासांत २९० मिमी पाऊस

इंद्रायणी नदीला पूर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा’ शाळांना आज सुटी

लोणावळा शहराला पावसाने झोडपून काढले आहे. लोणावळ्यात शनिवारी रात्रीपासून शहरात पाऊस कोसळत असून गेल्या चोवीस तासात २९० मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. इंद्रायणी नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शहरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने मंगळवारी (१७ जुलै) लोणावळा व परिसरातील शाळांना सुटी जाहीर केली आहे.

लोणावळा शहरात ४ जुलैपासून पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारी रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. पवना धरणात  गेल्या चोवीस तासात १५४ मिमी पाऊस पडला असून धरणात ६३.१७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मावळ तालुक्यातील वडिवळे, आंद्रा धरण, कासारसाई धरणाच्या पाणलोटात संततधार सुरू आहे. ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. टाटा कंपनीच्या वळवण आणि शितोरा धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे.

मुसळधार पावसामुळे लोणावळा, मावळ भागातील ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. धबधब्यांना पाणी आले आहे. नागरिकांनी शक्यतो कामाशिवाय बाहेर पडू नये. पर्यटकांनी डोंगरभागातील धबधबे तसेच पर्यटनस्थळांवर जाऊ नये. वाकसाई, कार्ला, कामशेत परिसरात इंद्रायणी नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या गावातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.