पाच दिवस पाऊस कायम; घाट विभागात जोर वाढणार

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी (१३ ऑगस्ट) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि जिल्ह्यतील घाटक्षेत्रांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गही हळूहळू वाढविण्यात आल्याने मुठा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस शहरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस कायम राहणार असून, घाटक्षेत्रांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात सध्या पाऊस आहे. पुणे शहर आणि परिसरातही गेल्या तीन ते चार दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. समाधानाची बाब म्हणजे शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या खडकवासला धरणसाखळीतील पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होत आहे.

शहरात बुधवारी रात्रीही पाऊस झाला. त्यानंतर गुरुवारी पहाटेपर्यंत पाऊस कायम होता. दिवसभर संततधार सुरू राहिली. संध्याकाळी उशिरा पावसाने काहीशी उघडीप दिली. दिवसभर ढगाळ स्थितीमुळे सूर्यदर्शन झाले नाही. त्यामुळे दिवसाच्या कमाल तापमानात घट होऊन ते २५.३ अंश सेल्सिअसवर आले होते.

पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार

पुणे शहर आणि परिसरामध्ये गुरुवारी (१३ ऑगस्ट) १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला. लोणावळ्यात सर्वाधिक १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वेल्हे येथे ९०, तर मुळशीत ५० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. आंबेगाव, घोडेगाव, भोर या भागात २० मिलिमीटर पाऊस झाला. शहरात यंदाच्या हंगामात ४८५ मिलिमीटर पाऊस झाला असून, तो सरासरीच्या तुलनेत १०३ मिलिमीटरने अधिक आहे.