पुण्यात पावसाची संततधार कायम असून सोमवारी रात्री पावसाने शहराला झोडपून काढले. पावसाचा जोर वाढल्यानंतर शहरातील मध्यवर्ती आणि उपनगरातील अनेक नागरी वसाहतीमधील घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.

यंदा पुण्यावर पावसाची आभाळमाया दाटून आल्यासारखंच चित्र आहे. सप्टेंबरमध्ये पावसाने कहर केला होता. यात जीवितहानीबरोबर मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून पुण्यात संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मतदान करताना नागरिकांनाही समस्यांना सामोर जावं लागलं. त्यानंतर सोमवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्यानं मध्यवर्ती शहरासह उपनगरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. येरवडा शांतीनगर, घोरपडी गाव, वानवडी आझादनगर , बी.टी. कवडे रोड, पद्मावती, मार्केटयार्ड या भागातील सोसायटी आणि वसाहतींमधील घरांमध्ये पाणी शिरले होते, अशी माहिती अग्नीशमन विभागानं दिली.

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे आंबील ओढ्याला पूर आल्याने कात्रजपासून ते दांडेकर पुलापर्यंत काठांवरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे अरण्येश्वर परिसरातील टांगेवाली कॉलनी येथील भिंत कोसळली. यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर या पावसामुळे पुण्यात एकूण २३ नागरिकांना जीव गमवावा लागला होता.