पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळा परिसरात गेल्या 24 तासात 157 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी लोणावळा शहर आणि परिसरात 2 हजार 514 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. अस आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा पुनरागमन केल्याने लोणावळा शहरातील नागरिक सुखावले आहेत.

लोणावळा शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस बरसत आहे. त्यामुळे लोणावळा परिसरातील सर्वच पर्यटनस्थळ, धबधबे, भुशी धरण हे ओसंडून वाहात आहेत. परंतु, या वर्षी पर्यटकांना बंदी असल्याने पर्यटस्थळांवर शुकशुकाट आहे. मात्र, काही पर्यटक प्रशासनाने घालून दिलेले नियम झुगारून आणि पोलिसांची नजर चुकवून पर्यटनस्थळी येतात. अश्या शेकडो जनांनावर लोणावळा पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या 24 तासात 157 मिलिमीटर पाऊस झाला असून यावर्षी एकूण 2 हजार 514 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी कालचा पाऊस 18 मिलिमीटर होता तर एकूण 4 हजार 983 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षी च्या तुलनेत यावर्षी निम्मा पाऊस कोसळला आहे.

पिंपरी-चिंचवडकरांना पाणी पुरवठा करणारे पवना धरण 56.19 टक्के भरले

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 68 मिलिमीटर पाऊस कोसळला असून धरण 56.19 टक्के भरले आहे. 1 जून 2020 पासून आजच्या तारखेपर्यंत 912 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत एकूण 3 हजार 97 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर पवना धरण हे शंभर टक्के भरले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस खूपच कमी आहे. दरम्यान, 1 जून पासून पवना धरणाच्या पाणी साठ्यात 20.9 टक्के वाढ झाली आहे.