कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसानं काहीशी उसंत घेतली होती. मात्र शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांमध्ये पाऊस पुन्हा एकदा जोरदार बरसू लागला आहे. त्यामुळे बळीराजाला चांगलाच दिलासा मिळाला आहे. तसंच शहरांमधले नागरिकही सुखावले आहेत
येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस असाच कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. येत्या बुधवार पर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडेल असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम सरी बरसतील. तर ताम्हिणी, भीरा, लोणावळा, खोपोली, कोयना या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्येही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.तर पुण्यात देखील संध्याकाळनंतर पावसानं हजेरी लावली. राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्यास सुरुवात केल्याने काही प्रमाणात तरी दुबार पेरणीचे संकट दूर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारं मोडक सागर हे धरणही आजच सकाळी ओव्हर फ्लो झालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारली होती त्यामुळे राज्यातला शेतकरी हवालदिल झाला होता. आता मात्र चांगल्या सरी कोसळू लागल्यानं शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. तसंच राज्यातल्या धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणी टंचाईचं संकट ओढवणार नाही अशी चिन्हं तूर्तास तरी दिसत आहेत.