News Flash

धरणक्षेत्रांत दमदार पावसाची हजेरी ; पाणीसाठा ५४ टक्क्य़ांवर

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणक्षेत्रांत दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावली

संग्रहित छायाचित्र

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणक्षेत्रांत दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठय़ात दोन टक्क्य़ांनी वाढ होऊन पाणीसाठा ५४ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरात पावसाने विश्रांती घेतली होती. दीर्घ कालावधीनंतर दमदार पावसाने पुनरागमन केल्याने पाणीसाठा १५.३९ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा झाला आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या परिसरात गेल्या दोन आठवडय़ांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. परिणामी १०० टक्के भरलेल्या खडकवासला धरणातील पाणीसाठा ५३ टक्क्य़ांपर्यंत आला आहे. मात्र, गुरुवारी रात्रीपासूनच धरणांच्या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत टेमघर धरणाच्या परिसरात ४४ मिलिमीटर, वरसगावमध्ये ३२ मि.मी., पानशेतमध्ये २६ मि.मी. आणि खडकवासलामध्ये सहा मि.मी. अशा एकूण १०८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तर, शुक्रवारी दिवसभरात टेमघरमध्ये ४० मि.मी., वरसगावमध्ये ३३ मि.मी., पानशेतमध्ये १७ मि.मी. आणि खडकवासलामध्ये १५ मि.मी. अशा एकूण १०५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण सध्या ४९.५७ टक्के भरले असून, या धरणात ४.२३ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. पवना धरणक्षेत्रांत दिवसभरात २८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्य़ातील अन्य धरणांपैकी कळमोडी धरण १०० टक्के भरले आहे. त्यापाठोपाठ आंद्रा धरण ८७ टक्के, कासारसाई ८६ टक्के, गुंजवणी ५८ टक्के, नीरा-देवघर आणि भाटघर अनुक्रमे ५१ आणि ५० टक्के भरली आहेत. तर, अन्य धरणांमध्येही पावसाने पुनरागमन केले आहे. उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा उणे १४.१४ टीएमसी एवढा झाला आहे.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा

(टीएमसी आणि टक्क्य़ांमध्ये)

टेमघर १.६०        ४४.००

वरसगाव     ६.२४  ४८.६५

पानशेत      ६.५०  ६१.०९

खडकवासला  १.०६        ५३.७८

एकूण साठा   १५.३९ ५४.४१

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 3:07 am

Web Title: heavy rainfall in the dam area from which water supply to pune zws 70
Next Stories
1 नदीपात्रातील रस्त्यावर चारचाकी वाहनांना अघोषित बंदी
2 पुणे : प्रामाणिक रिक्षा चालकाने प्रवाशाचे २५ हजार केले परत
3 खेळाडूंना तणावाबाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ प्रशिक्षक हवा : राही सरनोबत
Just Now!
X