सांगली, कोल्हापूरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्य़ांत १२ हजार ३७४ घरांचे अंशत: आणि २८३ घरांचे पूर्णत: अशा १२ हजार ६५७ घरांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी दिली. सांगली, कोल्हापुरात पाण्याची पातळी अद्यापही धोक्याच्या पातळीपेक्षा अनुक्रमे चार फूट आणि एक फूट ११ इंच जास्त आहे. पूरग्रस्तांना रोख रकमेच्या मदतीचे वाटप आणि सर्वेक्षणाचे काम मंगळवारी सुरू करण्यात आले.

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा पाच जिल्ह्य़ांमधील पुरामुळे मृत झालेल्या बळींची संख्या ४९ झाली आहे. त्यामध्ये सांगलीत २४, कोल्हापुरात दहा, सातारा आणि पुण्यात प्रत्येकी सात, तर सोलापुरातील एकाचा समावेश आहे. धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने दोन्ही जिल्ह्य़ांतील पूरस्थिती पुढील काही तासांत सामान्य होईल. सांगलीत एक हजार २४८ घरे अंशत: आणि दहा घरे पूर्णत:, तर कोल्हापुरात आठ हजार २३६ घरे अंशत: आणि २६८ घरे पूर्णत: बाधित आहेत. साताऱ्यात पाच घरे पूर्णत: आणि दोन हजार ८९० घरे अंशत: बाधित आहेत, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाकडून मृत जनावरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. पूरग्रस्त भागातील विमा उतरवलेल्या आणि पुरात वाहून गेलेल्या किंवा मृत झालेल्या जनावरांबाबत तालुका पशु?धन विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र ग्राह्य़ धरून दि न्यू इंडिया, युनायटेड इंडिया, नॅशनल, ओरिएण्टल या चार विमा कंपन्या नुकसान भरपाई देणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ३४ (ल) अनुसार मदत साहित्य वाटप करताना स्वयंसेवी संस्थांनी कोणताही भेदभाव न बाळगता समान पद्धतीने वाटप करणे आवश्यक आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना मदत साहित्य पुरवायचे असल्यास संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्यामार्फतच समन्वयाने वाटप करावे, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले.

३७ गावे अद्यापही पुरात

पुराने अजूनही ३७ गावे वेढलेली आहेत. त्यामध्ये सांगलीतील पाच, कोल्हापूर आणि सोलापूरमधील प्रत्येकी १६ गावांचा समावेश आहे. या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. पुरामुळे विभागातील सहा लाख ४९ हजार ८६८ नागरिकांना स्थलांतरित केले आहे. त्यामध्ये सांगलीत तीन लाख ११ हजार ४८५, कोल्हापूर तीन लाख ३६ हजार २९७, सोलापूर एक हजार ९२५ आणि पुण्यातील १६१ जण आहेत.

  • कोल्हापूरला २४, सांगलीत १९ ट्रक मदत पाठवली
  • विभागीय आयुक्तालयाकडे जमा झालेली सहा लाख २५ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा
  • कोल्हापुरात एक लाख २५ हजार ७३२ वीज ग्राहकांचा, सांगलीत ४८ हजार २५५ वीजग्राहकांचा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत
  • सांगलीत २३, कोल्हापुरात २२ मार्गावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाडय़ा सुरू
  • सांगलीतील ४५, कोल्हापुरातील ४९ रस्ते अद्यापही बंद