कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्त भागात ११ संघ कार्यरत

कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने ११ संघ पाठवले आहेत. इलेक्ट्रिक, प्लंबिंग, वेल्डिंग आदी कामे करण्यासाठी हे तंत्रज्ञ, विद्यार्थी कार्यरत असून, एकूण ४२ संघ पूरग्रस्त भागात पाठवले जाणार आहेत.

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाचे उपसंचालक योगेश पाटील यांनी ही माहिती दिली. महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर परिसरात हाहाकार उडाला आहे. पूर ओसरल्यानंतर पुनर्वसनामध्ये अनेक कामे करावी लागत आहेत. त्यात मोडकळीला आलेली घरे, नादुरुस्त झालेला वीजपुरवठा, तसेच डागडुजी करण्यापासून विविध प्रकारची कामे पूर्ववत करावी लागत आहेत.

या पाश्र्वभूमंीवर, सर्वसामान्य नागरिकांना हातभार लावण्यासाठी व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) विद्यार्थ्यांचे संघ तयार करून पूरग्रस्त जिल्ह्य़ात पुनर्वसनाच्या कामासाठी पाठवले आहेत. एका संघात १२ ते १५ जणांचा समावेश आहे.

‘पुरामुळे अनेक घरांची वीजजोडणी, प्लंबिंग खराब झाले आहे. त्यामुळे या कामांसाठी विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले आहे. सुरुवातीला इलेक्ट्रिक, वायरिंग आणि प्लंबिंगची कामे करण्यात येत आहे. तर गरजेनुसार फॅब्रिकेशन, वेल्डिंगचे तंत्र अवगत असलेल्या विद्यार्थ्यांचे संघही पाठवले जाणार आहेत. पूरग्रस्त भागातील ११ संघांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सोलापूरच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर अमरावती, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, मुंबईच्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे संघ तयार आहेत. तसेच गरजेनुसार आणखी विद्यार्थीही पाठवता येतील. आयटीआयचे विद्यार्थी महावितरण, महानगरपालिका यांच्यासह काम करत असल्याने त्यांना अनुभव असतो,’ अशी माहिती पाटील यांनी दिली.