यंदा पुण्यामध्ये कोसळलेल्या मुसळधार पावासामुळे अनेक भागांतील जनजिवन विस्कळीत झालं. पुढील ४८ तास पुणेकरांसाठी महत्वाचे आहेत. कारण पुणे शहर आणि परिसरामध्ये पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे शहरांसह जिल्ह्याला मान्सूनोत्तर पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहे. शिरुर, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात बुधवारी (30 ऑक्टोबर) वादळी वारा, गारपीठीसह जोरदार पाऊस झाला. जुन्नरमधील ओतूर रोहोकडी येथे मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या पूराचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

दोन नोव्हेंबरनंतर पाऊस पूर्णपणे थांबेल, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली. ग्लोबल वॉर्मिंग तसेच उशीराने झालेलं मान्सूनचे आगमनाचा परिणाम म्हणून नोव्हेंबर महिन्यातही पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कयार चक्रीवादळाचा प्रभाव अद्याप कायम असून राज्यात शुक्रवारी (१ नोव्हेंबर) सर्वदूर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.लक्षद्वीप आणि लगतच्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रावर ‘महा’ हे चक्रीवादळ तयार झाले आहे. पश्चिम-मध्य अरबी समुद्रावर ‘कयार’ हे चक्रीवादळ अजूनही कार्यरत आहे. त्याच्या प्रभावामुळे शुक्रवारी राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.