सोसायटय़ा, घरांत पाणी, नाले आणि रस्त्यांवर गाळ, वीज पुरवठा खंडित

पुणे : बुधवारी रात्री शहरात काही वेळातच धुवाधार पाऊस झाल्याने बहुतांश भाग अक्षरश: गाळात गेल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अनेक सोसायटय़ा, वसाहतींमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. सीमाभिंतीही खचल्या. पाणी साचलेल्या रस्त्यांवर आणि नाल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गाळ जमा झाला. विखुरलेला राडारोडा, विद्युत वाहिन्या उद्ध्वस्त झाल्यामुळे खंडीत झालेला विद्युत पुरवठा, उद्ध्वस्त झालेले सेवा रस्ते आणि तुटलेले दुभाजक असे चित्र गुरुवारी शहरभरात दिसून आले.

शहरात बुधवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रात्री वाढला. अवघ्या दोन तासांत सरासरी ९७ टक्क्य़ांहून अधिक पाऊस झाल्यानंतर शहराच्या अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. या पावसाने गेल्या वर्षी २५ सप्टेंबरच्या कटू आठवणी जाग्या के ल्या. बुधवारी मध्यरात्री पावसाचा जोर कमी झाला असला तरी गुरुवारी त्याचे तीव्र पडसाद दिसून आले.

कोथरूड, हडपसर, शहरातील मध्यवर्ती पेठा, कर्वेनगर, सिंहगड रस्ता परिसर, वडगांवशेरीतल प्रमुख भाग, हडपसर, वारजे, शिवणे, औंध, पाषाण, सहकारनगर, धनकवडी, पद्मावती, बिबवेवाडी अशा ठिकाणच्या अनेक सोसायटय़ांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या.  आंबिल ओढय़ाला पूर आल्यामुळे सहकारनगर धनकवडी भागातील अनेक इमारती, सोसयाटय़ांमध्ये शिरलेले पाणी काढण्यासाठी गुरुवारी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. जागोजागी अस्ताव्यस्त पडलेला राडारोडा, नाल्यातून वाहून आलेला गाळ, चिखल रस्त्यावर पसरला होता. दुभाजकांवरूनही पाणी वाहत असल्यामुळे अनेक रस्ते बंद करावे लागले. स्थानिक नगरसेवकांसह महापालिके च्या विविध अधिकाऱ्यांनी त्या-त्या भागात पाहणी दौरे करून परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र पावसाने दाणादाण उडविल्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दरम्यान, महापालिके च्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे दोनशे तक्रारी आल्या. या सर्व घटना पाणी शिरल्याच्या होत्या. त्याची दखल घेत पाण्याचा निचरा केल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी सांगितले.

चोवीस तासांत ११२ मिलिमीटर पाऊस!

पुणे शहर आणि परिसरामध्ये बुधवारी झालेल्या धुवाधार पावसाने नवा विक्रम नोंदविला असून, चोवीस तासांमध्ये शहरात सरासरी ११२ मिलिमीटर पावसाची भर पडली. बुधवारी सर्वाधिक पाऊस घोले रस्ता परिसरात १६३ मिलिमीटर इतका नोंदविला गेला. दरम्यान, कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकल्याने शहरात आज हलका पाऊस होता. शुक्रवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असून, शनिवारपासून त्याचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. शहर आणि परिसरामध्ये आठवडय़ापासून सलग पाऊस कोसळत आहे. बंगालच्या उपसागरातून आलेला कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्रातून पुढे अरबी समुद्राकडे जात असताना बुधवारी पावसाचा मोठा फटका बसला.

आंबिल ओढय़ाला पूर, नागरिक भयभीत

कात्रज तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर आंबिल ओढय़ालाही पूर आला. त्यामुळे सातारा रस्त्यावरील अनेक सोसायटय़ांना त्याचा फटका बसला. ओढय़ातील पाणी सोसायटय़ांमध्ये शिरले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले. पद्मावती, सहकारनगर, अरणेश्वर येथे सीमाभिंती खचण्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी गाडय़ांचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी दुचाकी वाहून गेल्याच्या घटना घडल्या.