मोसमी पावसाला चक्रीवादळामुळे विलंब; गुरुवापर्यंत राज्यात दाखल होण्याचा अंदाज

कोकणात बहुतांश ठिकाणी येत्या २४ तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. याबरोबरच उत्तर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, हा पाऊस पूर्व मोसमी पाऊस असून, नैर्ऋत्य मोसमी वारे गुरुवार (१३ जून) पर्यंत तळकोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल होण्याची शक्यता आहे.

मोसमी वाऱ्यांचे भारतातील आगमन यंदा उशिराने झाले आहे. ते ८ जूनला केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिण भागात दाखल झाले होते. एक आठवडय़ाहून अधिक विलंबाने केरळमध्ये पोहोचलेल्या मोसमी वाऱ्यांची प्रगती चांगली असली, तरी समुद्रातील घडामोडी त्यावर प्रभाव टाकू शकतात. अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे वादळात रूपांतर होणार असल्याचे संकेत आहेत. या सर्व प्रणालीच्या प्रभावातून मोसमी वारे खेचले जात आहेत. दक्षिण महाराष्ट्रात वेगाने पोहोचल्यानंतर मोसमी वारे कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग व्यापू शकतील. मात्र, कमी दाबाची प्रणाली उत्तरेकडे सरकल्यानंतर मोसमी वाऱ्यांचे प्रवाह कमी होणार असल्याने उर्वरित राज्यातील त्यांची प्रगती मंदावण्याची शक्यता आहे.

विलंब का? अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर आता त्याचे रूपांतर ‘वायू’ या चक्रीवादळात झाले असून त्याची तीव्रता दोन दिवसात वाढली आहे हे वादळ १३ जूनला गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या वादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे नैर्ऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल होण्यास विलंब होत आहे. परिणामी दुष्काळाने होरपळत असलेल्या विदर्भ, मराठवाडय़ासह इतर ठिकाणी मोसमी पावसाचे आगमन लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज आहे.

पर्जन्यभान..

मोसमी पाऊस केरळमधील कोची, तमिळनाडूतील मदुराईपर्यंत मजल मारत सोमवारी ईशान्य भारतातील राज्यात दाखल झाला आहे.

वायू चक्रीवादळामुळे बाष्पयुक्त ढगांची निर्मिती कोकण किनारपट्टीच्या भागात होणार आहे. परिणामी कोकणात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार असून समुद्र खवळलेला असेल.

मध्य प्रदेशात द्रोणीय स्थिती तयार झाली असून या स्थितीमुळे मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

गेल्या २४ तासांत मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली.