राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. मुंबई-ठाणे आणि नवी मुंबईत बुधवारी संध्याकाळी गडगडाटासह जोरदार पाऊस पडला.
राज्याच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कमी दाबाच्या तीव्र क्षेत्राने त्यात भर घातली आहे. बंगालच्या उपसागरातून आंध्र प्रदेशात धडकलेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने सरकले आहे. त्याचा पहिला फटका मराठवाडय़ाला बसला. त्यापाठोपाठ सोलापूर, सांगलीसह मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांमध्येही अतिवृष्टी झाली. कोकणातही अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. पुणे शहर आणि परिसरातही संध्याकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. कोल्हापूर आणि महाबळेश्वर परिसरांतही पाऊस कायम होता.
देशात सध्या मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू आहे, मात्र राज्यात सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम होतो आहे. तेलंगणा राज्यावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राकडे सरकले आहे. त्याची तीव्रता कमी होण्याचा अंदाज असला, तरी त्यामुळे राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे.
मुंबईत शिडकावा..
मुंबई : मुंबईत बुधवारी अनेक ठिकाणी एक ते पाच मिमी पावसाची नोंद झाली. तर नवी मुंबईत पावणे, सानपाडा, नेरूळ आणि पनवेल येथे काही ठिकाणी २० ते ४० मिमी, बेलापूर येथे ४० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. ठाणे आणि परिसरात सायंकाळी पावसाची रिपरिप सुरू होऊन पाच ते १० मिमी पाऊस नोंदविण्यात आला. उपनगरांत काही भागात पावसामुळे वाहतुककोंडी झाली होती.
शनिवापर्यंत जोर कायम
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १७ ऑक्टोबपर्यंत राज्यात विविध ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांत काही ठिकाणी १५ आणि १६ ऑक्टोबरला अतिवृष्टीचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूर, सातारा जिल्ह्य़ांतही तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 12:09 am