28 February 2021

News Flash

पुण्यात जलधारांचा कहर

वस्त्यांमध्ये पाणी, रस्तेही जलमय, नागरिक भयभीत

संग्रहित

वस्त्यांमध्ये पाणी, रस्तेही जलमय, नागरिक भयभीत

पुणे : पुणे शहर आणि परिसरात बुधवारी पावसाने कहर केला. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसाने रात्री साडेआठनंतर रौद्ररूप धारण केल्याने सखल भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले, तर अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने ते बंद झाले. कात्रज तलाव तुडुंब भरून वाहिल्याने आंबिल ओढय़ाच्या पाणीपातळीत वाढ झाली. गतवर्षी २५ सप्टेंबरला याच ओढय़ाच्या पुरामुळे दक्षिण पुण्यात हाहाकार उडाला होता. त्यामुळे बुधवारी रात्री झालेल्या मुसळधारांनी नागरिकांमध्ये धडकी भरली होती. मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, वसाहतींमध्ये शिरलेले पाणी काढण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते.

शहरात सलग पाच दिवसांपासून पाऊस होत आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शहरात बुधवारीही मोठा पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज होता. त्यानुसार दुपारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. रात्री पावसाचा जोर वाढला. रात्री साडेआठ ते साडेदहा या कालावधीत शहरात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळला. दोन तासांच्या कालावधीत मोठा पाऊस झाल्याने सहकार नगर, अरण्येश्वर, कोथरूडमधील डहाणूकर कॉलनी, सिंहगड रस्ता, विठ्ठलवाडी, येरवडा आदी भागातील ७० ते ८० ठिकाणच्या सोसायटय़ा आणि वसाहतींमध्ये पाणी शिरले. शहराच्या मध्य वस्तीतही काही भागात पाणी शिरण्याचे प्रकार झाले. शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, सिंहगड रस्ता, पुणे-सातारा रस्ता, फग्र्युसन रस्ता आदी रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. मध्य वस्तीतील बहुतांश रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. सिंहगड रस्ता विठ्ठलवाडी भागापासून रात्री बंद करण्यात आला होता.

अकराच्या सुमारास पावसाचा जोर काहीसा ओसरला, पण मध्यरात्री पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. दरम्यानच्या काळात कात्रज तलाव भरल्याने मोऱ्यांवरून मोठय़ा प्रमाणावर पाणी वाहू लागले. त्यामुळे आंबिल ओढय़ाच्या पाणीपातळीत वाढ झाली. ओढय़ालगतच्या सोसायटय़ा आणि वस्त्यांमधील नागरिकांमध्ये त्यामुळे धडकी भरली होती. पाणी साठण्याची शक्यता असलेल्या जागेवरील वाहने नागरिकांनी दूर केली. आपत्ती व्यवस्थापन पथकानेही या भागात तातडीने मदतकार्य सुरू केले. अग्निशामक दलाकडे रात्री उशिरापर्यंत पाणी शिरल्याबाबतच्या तक्रारी येत होत्या. जीवितहानी किंवा अन्य दुर्घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद नसल्याचे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुणे यांनी सांगितले.

उजनीतून २ लाख ३० हजार क्युसेकने विसर्ग

पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने उजनी धरणातून रात्री तब्बल २ लाख ३० हजार क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे पुढील गावांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे. पाणी साचल्याने संध्याकाळी पुणे-सोलापूर महामार्गही बंद करण्यात आला होता. रात्री दहानंतर या भागातील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

आणखी दोन दिवस पावसाचा जोर

पुणे शहर आणि जिल्ह्यमध्ये आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. काही भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 2:32 am

Web Title: heavy rains lash pune heavy rains in pune cause waterlogging zws 70
Next Stories
1 नदीसंवर्धन प्रकल्पाला भूसंपादनाचा अडसर
2 पुण्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता
3 रुग्णसंख्या घटल्याने प्राणवायूची मागणी २५ टक्क्यांनी कमी
Just Now!
X