सलग चार दिवस आलेल्या सुट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील चारचाकी वाहनांची संख्या वाढल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक गुरुवारी सकाळी मंदावली होती. पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत होत्या. दुपारनंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली. द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी महामार्ग पोलीस सकाळपासून प्रयत्न करीत आहेत.
धुलिवंदन, गुडफ्रायडे, चौथा शनिवार आणि रविवार असे सलग चार दिवस जोडून सुट्या आल्यामुळे मुंबई, ठाण्यातील अनेक प्रवासी द्रुतगती मार्गावर आल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांब रांगा दिसत होत्या. लोणावळ्याजवळ अमृतांजन पुलानजीक वाहतूकीची गती मंदावत असल्याने त्याचा परिणाम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर झाला. त्यातच वाहनांची संख्या जास्त असल्यानेही वाहतूक वेग मंदावली. पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.