पुण्यात हेल्मेटसक्तीवरून झालेली आंदोलनं आपल्याला ठाऊक आहेतच. अशातच आता दुचाकीस्वारासह त्याच्यासोबत मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट घालावे ते न घातल्यास कारवाई होणार असा नियम पुणे वाहतूक पोलिसांनी केला आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात आम्ही जनजागृती करणार आहोत असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे शहरात १ जानेवारी २०१९ पासून हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाया चालकांवर वाहतुक पोलिसाकडून मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाईला सुरवात केली. या कारवाईला पुणे शहरातील अनेक संघटनांनी विरोध देखील दर्शविला होता. या विरोधात रस्त्यावर उतरून निषेध देखील नोंदवला होता. या सर्व घडामोडी मागील तीन महिन्यात घडल्या असताना. आज पुणे वाहतुक पोलिसांकडून दुचाकी चालकासह मागे बसणार्‍या व्यक्तीनेही हेल्मेट घालावे असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला पुणेकर नागरिक कशा प्रकारे प्रतिसाद देतात आता हे पाहावे लागणार आहे.

याबाबत वाहतुक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले की, पुणे शहरात १ जानेवारी पासून जे दुचाकी चालक हेल्मेट न घालता वाहन चालवित आहेत, अशांवर कारवाई केली जात आहे. मागील काही दिवसांत दुचाकीच्या मागे बसणार्‍या व्यक्तींचाही अपघातामध्ये मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे आता दुचाकी चालकासह मागे बसणार्‍या व्यक्तिने देखील हेल्मेट घालावे असे आम्ही आवाहन केले असून आता अशा दुचाकी चालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.