साधारणत: ८० च्या दशकानंतर भारतात एकत्रित कुटुंबपद्धतीचे विभाजन सुरू झाले. आर्थिक स्थिती कितीही चांगली असली, तरी पती-पत्नी आणि स्वखुशीने एकच मूल हे सुखी कुटुंब मानले जाण्याचा त्यानंतरचा टप्पा होता. आता कुटुंबाची संकल्पना अधिक आक्रसत चालली आहे. स्वातंत्र्यप्रियता व आर्थिक सक्षमतेमुळे कुटुंबाचा प्रवास एकल सदस्यापर्यंत पोहोचला आहे. अशा बदललेल्या सध्याच्या सुखी कुटुंबाच्या व्याख्येत एका पेटचा समावेश असतोच. त्यामुळे श्वान, मांजर, पोपट किंवा माशांच्या रंगीबेरंगी प्रजातींनी भरलेली मत्स्यपेटी (फिशटँक) घराघरांत अविभाज्य घटक झाली आहे. कमावत्या दाम्पत्यांमुळे ऐंशीच्या दशकात निर्माण झालेला पाळणाघरांचा उद्योग हल्ली जसा फोफावलाय, तसेच अगदी अलिकडेच सुरू झालेल्या प्राणी पाळणाघरांना प्रतिसाद वाढत आहे. पण घरातील प्राण्याला पाळणाघरामध्ये किंवा डॉग बोìडगमध्ये ठेवणे अनेकांना शक्य नसते. शिवाय प्राणी पाळणाघरातील देखरेखीबाबत खात्री नसते.

अशा वेळी घरातील श्वान किंवा मांजरांची खाण्या-पिण्याची तजवीज केली, तरी नोकरीनिमित्ताने आठ ते बारा तास घरापासून लांब असताना पेट काय करीत असतील याची उत्सुकता प्राणिपालकांना असतेच. त्याचवेळी रिकामे घर पाहून भुंकणाऱ्या किंवा रडणाऱ्या या श्वानाचा सोसायटीला होणारा त्रास, एकटे वाटल्याने त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम अशा अनेक काळज्याही जोडीला असतात.

नोकरीच्या धबडग्यात जिथे असाल तिथून घरातील प्राण्यांवर लक्ष ठेवण्याची इच्छा असणाऱ्या पालकांसाठी ‘पेट मॉनिटिरग सिस्टिम’ किंवा ‘पेटीफिशियल इंटेलिजन्स’ या प्रणालींचा उदय झाला आहे. थोडक्यात काय तर दूर राहूनही पेटच्या संगोपनाची जबाबदारी प्राणिपालक सहज पार पाडू शकतो. घरापासून दूर असलात तरी आपल्या घरातील प्राण्याशी संवाद साधता येईल, त्याच्या हालचाली टिपता येतील, त्याला खाणेही देता येईल अशी ‘पेटबोट’ आणि ‘फरबो कॅम’ ही उपकरणे बाजारपेठेत दाखल झाली असून, त्याला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

 ‘पेटीफिशियल इंटेलिजन्स’

कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले रोबो न थकता माणसाला मदत करतात. या कार्यप्रणालीला ‘आर्टििफशियल इंटेलिजन्स’ संबोधतात. या प्रकारेच प्राण्यांच्या संगोपनासाठी मदत करणाऱ्या उपकरणांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रणालीचे ‘पेटीफिशियल इंटेलिजन्स’ असे नामकरण करण्यात आले. प्राणी संगोपनासाठी वेगवेगळी उपकरणे तयार करणाऱ्या या कंपन्यांनी २०१४ पासून याबाबतचे संशोधन सुरू केले. स्मार्टफोनचा वापर करून घरातील प्राण्याशी संवाद साधता यावा, या दृष्टीने विविध संकल्पना राबविण्यात आल्या. त्यातून कॅनडामध्ये ‘पेटबोट’ तयार झाले. झोरान ग्रॅबोवॅक या तरुणाने ‘स्टार्ट अप’ कंपनी सुरू केली. ‘प्राण्यांची काळजी घेणे अधिक सोपे’ अशा आशयाचे या उत्पादनाचे ब्रीदवाक्य आहे. त्याचा लगेचच प्राणिपालकांमध्ये गाजावाजा झाला. याच प्रकारे तवानमध्ये ‘फरबो कॅम’ची निर्मिती झाली. ही उपकरणे तयार झाल्यानंतर समाज माध्यमांचा वापर करून या संकल्पनांचा प्रसार उपकरणांच्या निर्मात्यांनी केला आणि प्राणिप्रेमींनी त्याच्या उत्पादनासाठी भांडवलही उभे करून दिले. ‘पॉबो’ आणि ‘पेटझी’ ही उत्पादनेही पशूपालकांच्या पसंतीस उतरली आहेत.

काम कसे चालते?

घरातील टेबलवर ठेवता येईल असे हे उपकरण आहे. यातील स्मार्टफोनला कॅमेरा जोडलेला असतो. अ‍ॅपच्या माध्यमातून त्याची हाताळणी करता येते. कॅमेराखालील डब्यात प्राण्याचे खाणेही साठवता येते. त्याचप्रमाणे प्राणिपालक ध्वनिवर्धकाच्या माध्यमातून घरातील प्राण्याला आपला आवाजही ऐकवू शकतात. स्मार्टफोनवर अ‍ॅप सुरू केले की घरातील प्राण्याच्या हालचाली टिपता येतात. त्याला हाक मारता येऊ शकते. श्वान किंवा मांजर उपकरणाजवळ आल्यावर त्याला खाणे देता येते. ‘पेटबोट’ची ओळखच प्राण्यांचा सेल्फी घेणारे उपकरण अशी झाली आहे. ‘फेस डिटेिक्टग’ टेक्नॉलॉजी हे याचे वैशिष्टय़ आहे. कॅमेराजवळ प्राणी आल्यानंतर त्याचे छायाचित्र टिपून ते फोनवर मिळते. छायाचित्र पालकाला मिळाले की त्या बदल्यात डब्यातले खाणे श्वान किंवा मांजरीला मिळते. ‘फबरे’वर असलेली ‘बाìकग अलर्ट सिस्टिम’ प्राणिप्रेमींसाठी कुतूहलाचा विषय ठरली आहे. घरात कुणी नसताना कुत्रे भुंकत असल्यास त्याचा संदेश स्मार्टफोनवर येतो. अशा वेळी हाक मारून श्वानाला शांत करता येऊ शकते. मालकाचा आवाज ऐकून प्राणी शांत होतो.

ऑनलाइन बाजारात उपलब्ध

गतवर्षी सुरुवातीला व्यावसायिक पातळीवर ही दोन्ही उपकरणे बाजारात दाखल झाली आहेत. भारतात अद्याप त्याची थेट विक्री होत नाही. तरीही ऑनलाइन बाजारातून त्याची खरेदी होत आहे. येत्या काळात ‘पेटबोट’ हे उपकरण भारतातही उपलब्ध करून देण्याची त्याच्या निर्मात्याची योजना आहे. याशिवाय प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अनेक कॅमेरे संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. साधारणत: सात हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत या उपकरणांच्या किमती प्राणिपालकांच्या हौसेपुढे कमीच आहेत.