जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने (४ फेब्रुवारी) हृदयमित्र प्रतिष्ठानतर्फे ‘कॅन्सर मित्र हेल्पलाईन’ सुरू करण्यात आली असून या माध्यमातून कर्करोगाच्या रुग्णांना उपचार व शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत कुठून मिळवता येईल, याबाबतचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत मुंदडा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ९८२२०४१७५९ या क्रमांकावर दूरध्वनी करुन कर्करुग्णांना आर्थिक मदत मिळवण्याबद्दलचे मार्गदर्शन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेतर्फे ‘कॅन्सर शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत कशी मिळवावी’ ही लहान पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली आहे. या पुस्तकात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजना, देवस्थानांचे ट्रस्ट अशा माध्यमांमधून निधी कसा प्राप्त करता येईल याबाबतची माहिती दिली आहे. कर्करुग्णांसाठी काम करणारे मदत गट, मोफत किंवा सवलतीच्या दरात औषधे पुरवणाऱ्या संस्था, कर्करुग्णाचे अखेरचे दिवस सुसह्य़ करणाऱ्या संस्था अशा गोष्टींची माहितीही पुस्तकात दिल्याचे मुंदडा यांनी सांगितले. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात ही पुस्तिका वीस रुपये शुल्कात उपलब्ध होईल, असे ते म्हणाले.