‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’तर्फे लवकरच जादूटोणाविरोधी कायद्याशी संबंधित तक्रारींविषयी मध्यवर्ती हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. जादूटोणा आणि अंधश्रद्धांचे बळी ठरणाऱ्यांना या हेल्पलाइनवर मार्गदर्शनाबरोबरच कायद्याचा सल्लाही मिळू शकेल.
महाराष्ट्र अंनिसचे कार्यकारी अध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार जादूटोणाविरोधी कायदा अमलात आल्यापासून या कायद्याअंतर्गत राज्यभरातून ७० गुन्हे नोंदवले गेले आहेत. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या वैयक्तिक दूरध्वनी क्रमांकांवर दररोज जादूटोण्याच्या प्रकरणांमधील पीडितांचे दूरध्वनी येतात. आमचे दूरध्वनी क्रमांक प्रसिद्धही केलेले नसताना ही स्थिती आहे. अंधश्रद्धेच्या प्रकरणांमध्ये बलात्कार आणि खुनांसारखे गुन्हे घडले असूनही अनेक ठिकाणी ते जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत नोंदवून घेतले गेलेले नाहीत. या कायद्याअंतर्गतच हे गुन्हे नोंदवले गेले तर कदाचित त्यासाठी अधिक कडक शिक्षा होऊ शकेल. त्यामुळे आता महाराष्ट्र अंनिसच्या वतीने पीडितांसाठी आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी एक मध्यवर्ती हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. या हेल्पलाइनचा क्रमांक लवकरच जाहीर केला जाईल.’’
जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीत जिल्हापातळीवर निरीक्षकांची नेमणूक करणे आवश्यक असूनही काहीच जिल्ह्य़ांमध्ये हा नियम पाळला जात असल्याचेही पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘हे निरीक्षक या कायद्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. कायदा अमलात येऊन दहा महिने झाल्यानंतरही निरीक्षकांच्या नेमणुकीबद्दलचा संभ्रम कायम असल्याचे दिसून येते.’’
अंधश्रद्धा निर्मूलनाची अभिव्यक्ती रिंगण नाटय़ातून
संस्थेला ९ ऑगस्ट रोजी २५ वर्षे पूर्ण होत असून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेतर्फे ‘लोक-रंगमंच रिंगण नाटय़ा’चे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध नाटय़ दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली या रिंगण नाटय़ाची तयारी सध्या सुरू आहे. महाराष्ट्र अंनिसची गाणी, बुवाबाजीच्या चमत्कारांमागचे वैज्ञानिक सत्य उलगडणारे प्रयोग आणि अंधश्रद्धानिर्मूलनाविषयीचे विचार मांडणारी नाटुकली असे या रिंगण नाटय़ाचे स्वरूप असून राज्यातील स्थानिक कलावंत हे नाटय़ सादर करणार आहेत. ९ तारखेला या रिंगण नाटय़ाचा प्रयोग साताऱ्यात तर २० तारखेला तो पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.
हत्येचा तपास सीबीआयकडे दिला, पण...
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाबद्दल डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘‘डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे (केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग) दिला असला, तरीही तपासात प्रगती झाल्याचे दिसत नाही. सीबीआयच्या तपास अधिकाऱ्यांशी झालेल्या बोलण्यावरून सीबीआय अजून कागदपत्रांचा अभ्यास करत असल्याचे जाणवते. या प्रकरणाचा शोध कधी लागेल याचा अंदाज येत नाही.’’