पुणे : पालिकेची तिजोरी अशी ओळख असलेल्या स्थायी समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक हेमंत रासने यांची, तर सभागृहनेतापदी धीरज घाटे या दोघांची निवड भारतीय जनता पक्षाकडून मंगळवारी करण्यात आली. हेमंत रासने आणि धीरज घाटे यांना ही पदे मिळाल्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघातील वर्चस्वही दिसून आले. दरम्यान, पीएमपी संचालकपदासाठीची निवड येत्या काही दिवसांत मुख्य सभेत होणार आहे.

भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेल्या एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार पक्षाकडून आमदार सुनील कांबळे यांना स्थायी समिती अध्यक्षपदाचा, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना पीएमपी संचालकपदाचा राजीनामा देण्याची सूचना करण्यात आली होती. तसेच सत्ता मिळाल्यापासून सभागृहनेता पदावर असलेल्या श्रीनाथ भिमाले यांनाही राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार या तिन्ही पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी राजीनामे दिले. त्यानंतर सभागृहनेतापदी धीरज घाटे यांची तर स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शहर भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस गणेश बीडकर यांनी यांच्या नावाची घोषणा केली. महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी बदलण्याचा निर्णय सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने घेतल्यानंतर भाजपच्या तीन नगरसेवकांना पदाधिकारी होण्याची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यासाठी इच्छुक नगरसेवकांकडून मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. महापौरपद खुल्या गटासाठी आरक्षित झाल्यानंतर पक्षाने मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली. त्या पदासाठी पक्षातून अनेकजण इच्छुक होते. आता पदाधिकाऱ्यांमध्ये बदल होणार असल्यामुळे मोर्चेबांधणीला वेग आला आहे. धीरज घाटे, हेमंत रासने यांची नावे प्रारंभापासून चर्चेत होती.

हेमंत रासने हे महापालिकेत तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. स्थायी समिती अध्यक्षपदासाठीच्या स्पर्धेत ते यापूर्वीही होते. श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे ते पदाधिकारी आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी रासने हे कसबा मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र त्यांना संधी मिळू शकली नाही. सभागृहनेतापदी संधी मिळालेले धीरज घाटे हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असलेले घाटे यांनी परभणी आणि बीड येथे जिल्हा प्रचारक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आक्रमक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. पक्षात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी युवा मोर्चाच्या संघटनाची जबबदारी सांभाळली. युवा मोर्चाच्या सरचिटणीसपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या ते भाजप प्रदेश चिटणीस म्हणून कार्यरत आहेत. आंदोलनात आक्रमकपणे उतरणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. घाटे हे नवी पेठ-पर्वती या प्रभागातून प्रथमच निवडून आले आहेत. महापालिकेच्या शहर सुधारणा समितीमध्ये त्यांनी काम केले आहे.

दोन्ही पदे कसब्यात

घाटे आणि रासने हे दोघे विधानसभा निवडणुकीसाठी कसबा मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र त्यांना संधी मिळू शकली नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर त्यांना ही पदे देण्यात आल्याचे बोलले जात आहे. महापालिकेचे सभागृह सांभाळण्याचे आव्हान घाटे यांच्यापुढे असणार आहे. तर शहर विकासाच्या योजनांना गती देण्याची जबाबदारी रासने यांच्यावर राहणार आहे.

 

धीरज घाटे हेमंत रासने