स. प. महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाची काढून घेतलेली मान्यता स. प. ला परत मिळणार आहे. या निर्णयामुळे महाविद्यालयातून बारावीची परीक्षा देणाऱ्या चौदाशे विद्यार्थ्यांचा जीव भांडय़ात पडला आहे.
खोटी गुणपत्रिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल पुणे विभागीय शिक्षण मंडळाने स. प. च्या कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता काढून घेतली होती. महाविद्यालयाची मान्यता परत मिळावी, मंडळाकडून ऑक्टोबर परीक्षांच्या गुणपत्रिका महाविद्यालयाला देणे बंद करण्यात येऊ नये आणि मंडळाने बारावी परीक्षांचे अर्ज स्वीकारावेत या मुद्दय़ांवर महाविद्यालयाने गुरुवारी मंडळाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
यापैकी ऑक्टोबर परीक्षांच्या गुणपत्रिका देणे आणि बारावी परीक्षांचे अर्ज स्वीकारण्याबाबत मंडळाने विद्यार्थीहित लक्षात घेऊन माघार घेतली आहे. तर खोटी गुणपत्रिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर महाविद्यालय आणि पुणे विभागीय मंडळ यांच्यापैकी कारवाई करावी याबद्दलच्या वादावर न्यायालयाने तोडगा काढला आहे. ९ डिसेंबपर्यंत महाविद्यालय आणि मंडळ या दोघांनी मिळून या विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करावी असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. पर्यायाने स. प. ला मान्यता परत मिळणार असून त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.