शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील शिक्षणसंस्थांमधील वसतिगृहांची संख्या पुरेशी नाही. त्यामुळे वाढत्या विद्यार्थिसंख्येची गरज भागवण्यासाठी आता उच्चभ्रू वसतिगृहांचा कल उदयाला येत असून काही कंपन्यांनी अशी वसतिगृहे सुरू केली आहेत.

राज्य आणि देशासह परदेशी विद्यार्थीही मोठय़ा संख्येने शिक्षणासाठी पुण्यात येतात. विद्यापीठांसह शिक्षण संस्थांतील, महापालिकेची, स्वयंसेवी संस्थांची वसतिगृहे असूनही अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृहात जागा मिळत नाही. त्यामुळे निवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना सदनिका भाडय़ाने घेणे, पेईंग गेस्ट म्हणून राहाणे या पर्यायांचा आधार घ्यावा लागतो. मात्र, वाढती विद्यार्थिसंख्या, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन गेल्या एक दोन वर्षांमध्ये कंपन्यांनीही या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. ‘ऑक्सफर्ड कॅप’, ‘स्टँझा लिव्हिंग’, ‘ट्राइब अ‍ॅकोमोडेशन’, ‘यूवर स्पेस’ अशी काही उच्चभ्रू वसतिगृहे सध्या शहरात कार्यरत आहेत. कात्रज, टिंगरेनगर, कर्वेनगर, विमाननगर, कोथरूड, वाकड या भागांमध्ये ही वसतिगृहे आहेत.

‘देशातील ३.६ कोटी विद्यार्थी शिक्षणासाठी त्यांचे घर सोडतात. शिक्षणसंस्था त्यांच्या परीने विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून देतात. पण सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळत नाही. त्यामुळे शिक्षणसंस्थांमध्ये वसतिगृह न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी आम्ही या क्षेत्रात उतरलो.

कंपनीच्या वसतिगृहासह काही शिक्षण संस्थांच्या वसतिगृहांनाही सेवा पुरवली जाते. ३० ते ३६ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेच्या बाहेर राहावे लागते. हे प्रमाण बऱ्यापैकी मोठे आहे. कंपनीचे वसतिगृह असूनही विद्यार्थ्यांसाठी काटेकोर नियमावली आहे. तसेच त्यांना चांगल्या सोयीसुविधाही दिल्या जातात,’ असे ऑक्सफर्ड कॅपचे विपणन विभाग उपाध्यक्ष साकेत राव यांनी सांगितले.

सुविधा आणि शुल्क

सदनिका घेऊन किंवा पेईंग गेस्ट म्हणून राहताना विद्यार्थ्यांना भोजन, स्वच्छता, कपडे धुणे हे सगळे स्वतच करावे लागते. उच्चभ्रू वसतिगृहांमध्ये निवास, भोजन, वायफाय, व्यायामशाळा, कॅफेटेरिया, कपडे धुणे, स्वच्छता, वातानुकूलन यंत्रणा अशा सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवल्या जातात. वसतिगृहासाठी ८ हजार ते ४० हजार रुपये महिना भाडे आकारले जाते. मध्यमवर्गीय, उच्चमध्यवर्गीय आणि परदेशातून येणारे विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून ही शुल्करचना करण्यात आली आहे.

येत्या काळात संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता

पुणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र असल्याने विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे महत्त्वाची आहेत. मात्र शैक्षणिक संस्थांच्या वसतिगृहांमध्ये केवळ १२ ते १५ टक्के विद्यार्थ्यांचीच सोय होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित, सोयीस्कर वातावरण आणि सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होतात. अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही वसतिगृहे उपयुक्त ठरतात. या क्षेत्रातील प्रचंड  संधी ओळखून कंपन्यांनी वसतिगृहांच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. वसतिगृहांप्रमाणेच को-लिव्हिंग ही संकल्पनाही आता रूजते आहे. सध्या स्थावर मालमत्ता क्षेत्र थंड असल्याने बांधकाम व्यावसायिकांच्या सदनिका विकल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे या सदनिका, इमारती भाडय़ाने देण्याकडे त्यांचा कल आहे. या क्षेत्रात संधी असल्याने येत्या काळात आणखी काही कंपन्या वसतिगृहे सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रात स्पर्धा निर्माण होऊ  शकेल. मात्र, परवडणारी किंमत, सेवा आणि दर्जा देऊ  शकणारेच टिकतील.

– परमवीर सिंग पॉल, पुणे शाखा संचालक, नाईटफ्रँक