नवा कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली असली, तरी त्याचे प्रमाण अगदीच कमी आहे. त्यामुळे डिसेंबर-जानेवारीपर्यंत बाजारात नवा कांदा येईपर्यंत कांद्याचे भाव भडकलेलेच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या पुणे जिल्ह्य़ातील ओतूर येथे या आठवडय़ात केवळ चौदाशे क्िंवटल कांद्याची आवक झाली.
कांद्याचे भाव सध्या भडकलेले आहेत. ओतूर येथे या आठवडय़ात कांद्याचा दर क्िंवटलला तब्बल ४५०० ते ६५०० रुपये इतका होता. या वर्षी आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथील कांद्याचे पीक बऱ्याच प्रमाणात वाया गेले. त्यामुळे त्या भागात तसेच, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांमध्येही महाराष्ट्रातून कांद्याची मागणी होती. तसेच, एप्रिलमध्ये असलेली कांद्याची मागणी पुढच्या काळात वाढतच गेली. त्यातच महाराष्ट्रात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी कांद्याचे भाव भडकले. आताच्या स्थितीबाबत ओतूर कांदा बाजार समितीचे कार्यालय प्रमुख स्वप्निल काळे यांनी सांगितले, की कांद्यासाठी महाराष्ट्रात अशी परिस्थिती आतापर्यंत उद्भवली नव्हती. दोन वर्षांपूर्वी कांद्याचे भाव भडकले होते. मात्र, ते केवळ आठ-दहा दिवसांसाठी होते. आता मात्र सलग काही महिने कांद्याचा भाव भडकलेलाच आहे.
ओतूरच्या बाजारात नवीन कांदा येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, काही शेतकरीसुद्धा तो इतरत्र पाठवत आहेत. मात्र, त्याचे प्रमाण अगदीच कमी आहे. आणखी एक-दीड महिन्यांनी म्हणजे डिसेंबर-जानेवारीमध्ये नव्या कांद्याची आवक वाढल्यास त्याचे दर स्थिर होण्यास मदत होईल. सध्या वाढलेल्या दराचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे, असेही काळे यांनी सांगितले.
टोमॅटोचा दरही वाढलेलाच राहणार       
टोमॅटोचा सर्वात मोठा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगाव बाजारात टोमॅटोला वीस किलोच्या क्रेटला २५० ते ३५० रुपये इतका भाव मिळत आहे. हे भावही लवकर उतरण्याची चिन्हे नाहीत. मालाची आवक कमी झाल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे.
पुण्यात कांदा ५० ते ८० रुपये
पुण्याच्या वेगवेगळ्या भागातील मंडईंमध्ये कांद्याचा भाव किलोला ५० ते ८० रुपयांपर्यंत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्याच वेळी गाडीवरविक्रीसाठी येणारा हलका कांदा २५ ते ३० रुपयांपर्यंत मिळत आहे. पुण्यातील वेगवगळय़ा भागातील मंडईंमध्ये शनिवारी ग्राहकांना पुढील दराने कांदा व टोमॅटो मिळत होता.
यशवंतराव चव्हाण नाटय़गृहासमोरील मंडई (कोथरूड)- जुना कांदा ७० रुपये, नवा कांदा ६० रुपये, टोमॅटो ६० रुपये
बीग बाजार (कोथरूड)- कांदा ६० रुपये, टोमॅटो ६० रुपये
शनिपार मंडई (सदाशिव पेठ)- कांदा ६० रुपये
महात्मा फुले मंडई (शुक्रवार पेठ)- जुना कांदा ८० रुपये, नवा कांदा ७० रुपये, टोमॅटो ६० रुपये
पर्वती पायथा (सिंहगड रस्ता)- कांदा ६० रुपये, टोमॅटो ४० रुपये