सावली देण्यासाठी मध्यवस्तीमध्ये अनोखी संकल्पना

कडाक्याचे ऊन, तापलेल्या रस्त्यांमुळे हैराण झालेल्या वाहनचालकांना आता शहराच्या मध्यवस्तीत दिलासा मिळतो आहे. सिग्नलला थांबलेल्या वाहनचालकांना  भर उन्हात सावली मिळवून देण्यासाठी सिग्नलजवळ कापडी छप्पर बांधण्यात आले आहेत. तीन चौकांमधील सात सिग्नलवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि नगरसेवक हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये पहिल्या टप्प्यात हुतात्मा कर्णिक चौक, आप्पा बळवंत चौक, बेलबाग चौक येथील सात सिग्नलवर थांबणाऱ्या वाहनचालकांसाठी कापडी छप्परची सोय करण्यात आली आहे. आणखी वीस ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुवर्णयुग तरुण मंडळाचे चेतन लोढा, प्रकाश चव्हाण, विनायक रासने, सौरभ रायकर या कार्यकर्त्यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

रासने म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. चौकात सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनचालकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी ही सुविधा करण्यात आली आहे.

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये अशा प्रकारचा प्रयोग केला आहे. गडकरी यांच्या प्रेरणेतून पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शहरातील अन्य चौकांत अशी सुविधा देण्यात येणार आहे. कापडी छप्परमुळे उन्हाचे प्रमाण कमी झाले असून रस्ते तापण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.

कापडी छप्परच्या सुविधेमुळे वाहतूक नियमांची अंमलबजावणी

प्रत्येक चौकातील सिग्नलवर छप्पर बांधताना वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी होईल, याची काळजी घेण्यात आली आहे. पादचारी पट्टे (झेब्रा क्रॅसिंग) संपण्याच्या ठिकाणी सावली पडेल, अशी सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत त्यामागे उभे रहात आहेत.