मुसळधार पावसाचा  फटका

पुणे जिल्ह्य़ासह सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्य़ात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका टोमॅटोला बसला आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे टोमॅटोच्या प्रतवारीवर परिणाम झाला असून किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

पावसामुळे टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. टोमॅटो खराब झाले आहेत. टोमॅटोचे बाह्य़ आवरण चांगले दिसत असले तरी त्यात पाणी असल्याने टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. वातावरण पोषक नसल्याने प्रतवारीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला चांगले दर मिळत असून गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे. किरकोळ बाजारात एक किलो टॉमेटोला ८० रुपये किलो असा दर मिळाला आहे, असे किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात पाच हजार पेटी टोमॅटोची आवक झाली. बाजारात दहा किलो टोमॅटोला २०० ते ३०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत. कोथिंबीर, मेथी या पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. गेल्या आठवडय़ात किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीचा दर १० ते १५ रूपये असा होता. कोथिंबीर आणि मेथीच्या एका जुडीची विक्री २० ते २५  रुपये दराने सध्या केली जात आहे.

मुसळधार पावसाचा फटका फळभाज्यांना

सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्य़ातून फळभाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणावर होते. पुणे जिल्ह्य़ात मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे फळभाज्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली असल्याचे आडते संघटनेचे अध्यक्ष अमोल घुले यांनी सांगितले.

टोमॅटो दरवाढीमागची कारणे

दोन वर्षांपूर्वी टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्या वेळी किरकोळ बाजारात एक किलो टोमॅटोला १०० ते १२० रुपये किलो असा दर मिळाला होता. पुणे जिल्ह्य़ातील मंचर, नारायणगाव भागात टोमॅटोची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. या भागातून मुंबई, पुणे शहरात टोमॅटो विक्रीसाठी पाठविला जातो. मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. टोमॅटोचे नवीन उत्पादन हाती येण्यापूर्वीच पावसाने झोडपले. त्यामुळे  टोमॅटो खराब झाले असून चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला चांगले दर मिळाले आहेत, असे किरकोळ बाजारातील विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.