महसुलात ३० टक्क्य़ांची घट

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत पाचशे मीटरच्या आतील अंतरावरील हॉटेल, दुकानांसह सर्व आस्थापनांमध्ये मद्यविक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून सुरु असून त्याचा दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. जिल्ह्य़ातील सोळाशेपेक्षा जास्त मद्यविक्रीची दुकाने बंद झाल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा लाखोंचा महसूल बुडत असल्याचे चित्र समोर आले आहे. उन्हाळी सुटीतील एप्रिल आणि मे या दोन महिन्यातील आतापर्यंतचा सर्वात कमी महसूल उत्पादन शुल्क विभागाकडे जमा झाला. महामार्गालगतची मद्यालये बंद केल्यानंतर देशी, विदेशी, बिअर आणि वाईनचा खप तीस टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात घटला आहे. एप्रिल महिन्यापासून उत्पादन शुल्क वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे मद्यविक्री करणारी दुकाने, हॉटेल आणि बारमध्ये मद्याचा अतिरिक्त साठा करण्यात आला होता. त्यामुळे बंदी आल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात मद्याचा खप वाढला होता. त्यामुळे महसुलात घट झालेली नव्हती. परंतु, मे महिन्यात मद्यविक्री आणि महसूल दोन्हीमध्ये घट झाली असून आतापर्यंतचा हा सर्वाधिक कमी महसूल आहे.

राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने राज्य शासनाकडून जास्तीत जास्त महसूल गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यातच महामार्गावरील मद्यविक्री बंदीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळणाऱ्या महसुलात घट झाली आहे. त्यामुळे महामार्गावरील मद्यविक्री बंदीवर तातडीने आणि योग्य तोडगा काढण्याची विनंती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून शासनाकडे करण्यात आली आहे.

chart