पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वेगमर्यादेचे पालन न करणाऱ्या वाहनांच्या विरोधात महामार्ग पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. महामार्ग पोलिसांनी कारवाईच्या वेळी केलेल्या पाहणीत गाडय़ांच्या वेगाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. द्रुतगती मार्गावर चालणाऱ्या एकूण कारपैकी तीस टक्के कार ताशी १२० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने चालविल्या जात आहेत. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर महामार्ग पोलिसांनी आता विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघातांचे प्रमाण मोठे आहे. द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघातांमागे वेगमर्यादेचे उल्लंघन हे मुख्य कारण असल्याचे दिसून आले आहे. महामार्ग पोलिसांनी वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर गेल्या काही दिवसांपासून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. महामार्गावरील वडगाव आणि खंडाळा या ठिकाणी वाहनांची वेगमर्यादा स्पीडगनमार्फत तपासली जाते. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना टोलनाका येथे थांबवून त्यांच्यावर कारवाई केली जाते.
ही कारवाई करीत असताना महामार्ग पोलिसांना धक्कादायक गोष्ट आढळून आली. द्रुतगती मार्गावर धावणाऱ्या एकूण कारपैकी तीस टक्के कार ताशी १२० ते १५० प्रतिकिलोमीटर या वेगाने चालविल्या जात असल्याचे लक्षात आले आहे. द्रुतगती मार्गावर ताशी ८० किलोमीटर ही वेगमर्यादा असताना दीडपट वेगाने कार चालविल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (एसव्हीयू) प्रकारातील कारचा समावेश आहे. काही कारची वेगमर्यादा १७० पर्यंत गेल्याचीही नोंद महामार्ग पोलिसांकडे आहे. त्यामुळे वेगावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या सात दिवसात १७२ वाहनांवर वेगमर्यादा उल्लंघनाची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहील, असे महामार्ग विभागाचे पोलीस निरीक्षक सुधीर अस्पट यांनी सांगितले.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सपाट आणि सरळ रस्ता असलेल्या ठिकाणी वाहनांचा वेग ताशी १२० किलोमीटरच्या पुढे जातो. सपाट रस्ता संपल्यानंतर असलेल्या वळणांवर मोटारीचा वेग नियंत्रित न झाल्यामुळे यापूर्वी अपघात झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी द्रुतगती मार्गावर वेगमर्यादेचे पालन करावे, असे आवाहनही महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.
महामार्ग पोलिसांची गेल्या सात दिवसातील वाहनांवरील कारवाई
दिनांक            खंडाळा          वडगाव
१० सप्टेंबर          ५                       ५
११                       ५                       ५
१२                       ६                        ६
१३                       ६                     २४
१४                     १५                    ३८
१५                       ६                    ३२
१६                       २                    १८